Tue, Jul 23, 2019 10:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गायक उदित नारायणच्या चिरंजीवाचे बेदरकार ड्रायव्हिंग

गायक उदित नारायणच्या चिरंजीवाचे बेदरकार ड्रायव्हिंग

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरीतील लोखंडवाला परिसरातून भरधाव वेगाने जात असलेल्या आदीत्य नारायण याच्या मर्सिडीज कारने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकासह प्रवासी महिला गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत वर्सोवा पोलिसांनी आदीत्य नारायणला अटक केली आहे.

सुप्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आदीत्य हा सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास त्याच्या मर्सिडीज बेन्झ कारने (एमएच 14 एफजे 6000) अंधेरी पश्‍चिमेकडील लोखंडवाला बॅकरोडवरुन भरधाव वेगाने जात होता. येथील इंद्रलोक इमारतीसमोर त्याच्या कारची धडक एका रिक्षाला बसली. या अपघातात वयोवृद्ध रिक्षाचालक राजकुमार पालेकर (64) आणि रिक्षामध्ये बसलेल्या प्रवासी सुरेखा शिवलकर (32) या गंभीर जखमी झाल्या. आपल्या हातून अपघात घडल्याचे लक्षात येताच कारमधून खाली उतरत आदित्यने दोन्ही जखमींना दोन्ही जखमींना तात्काळ उपचारांसाठी कोकीळाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले. 

अपघाताची माहिती मिळताच घटनस्थळी पोहचलेल्या वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे आणि पंचनामे करत घटनेची नोंद करुन तपास सुरू केला. वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांनी घटनेची गार्भियाने दखल घेत पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. अखेर जखमी शिवलकर यांची फिर्याद नोंदवून घेत, भादंवी कलम 279 आणि 338 यासह मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करत आदित्यला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.