होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदित्य, एकनाथ शिंदे, गीते, खैरेंची नेतेपदी वर्णी

आदित्य, एकनाथ शिंदे, गीते, खैरेंची नेतेपदी वर्णी

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 1:53AMमुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा समावेश शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला असून नेतेपदावर त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनंत गिते, लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनाही शिवसेना नेतेपदी बढती देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेेकर यांची अनपेक्षितपणे शिवसेनेच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. 

वाचा ठाण्यातील रिक्षाचालक शाखाप्रमुख ते शिवसेना नेते

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पार पडली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी संघटनात्मक वाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच त्यांना अधिक जोमाने काम करता यावे यासाठी त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करून नेतेपदाची जबाबदारी देण्याचा ठराव शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडला आणि गजानन कीर्तिकर यांनी त्यास अनुमोदन दिले. अ‍ॅड. बाळकृष्ण जोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

वाचा : ब्लॉगः पडद्यामागचे मिलिंद नार्वेकर अखेर पडद्यावर! 

याबरोबरच शिवसेनेच्या सचिवपदी मिलिंद नार्वेकर यांच्यासह युवा सेनेचे सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तर प्रवक्ते पदी अ‍ॅड. अनिल परब,  खा.अरविंद सावंत, आ. नीलम गोर्‍हे, मनीषा कायंदे, अमोल कोल्हे याची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. शिवसेनेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या संघटक पदावर हेमराज शहा, अण्णा मलाई, गोविंद गुळवे, अखिलेश तिवारी, विनय शुक्‍ला, गुलाबचंद दुबे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य समन्वयक म्हणून रवींद्र मिर्लेकर (उत्तर महाराष्ट्र, पुणे), विश्‍वनाथ नेरुरकर (मराठवाडा, नगर), अरविंद नेरकर (विदर्भ) आणि दगडू सकपाळ (पश्‍चिम महाराष्ट्र) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

वाचा : लोकसभा, विधानसभा स्वबळावर : उद्धव ठाकरे 

मनोहर जोशी, सुभाष देसाईंचे नेतेपद कायम

शिवसेना पक्षप्रमुख पक्षसंघटनेत शिवसेना नेते पद महत्त्वाचे मानले जाते. आतापर्यंत शिवसेनेत 8 नेते होते. त्यामुळे नव्या चेहर्‍यांना पक्षसंघटनेत संधी देताना मनोहर जोशी, सुभाष देसाई सुधीर जोशी, लीलाधर डाके यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना वगळले जाण्याची चर्चा होती. परंतु नेतेपदाची संख्या 8 वरून 13 करण्यात येऊन त्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्यात आले. दिवाकर रावते, संजय राऊत, रामदास कदम, गजानन कीर्तीकर यांच्यासोबतच एकनाथ शिंदे, अनंत गिते, आनंदराव अडसूळ आणि चंद्रकांत खैरे यापुढे शिवसेना नेते म्हणून काम पाहणार आहेत. विठ्ठल गायकवाड आणि रघुनाथ कुचिक यांची उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली.

आदित्य यांच्या नावाची घोषणा होताच जल्लोष

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीसाठी 9 जानेवारी रोजी अर्ज केला होता. त्यांची पक्षाच्या नेतेपदावर निवड करण्यात आल्याची घोषणा गुलाबराव पाटील यांनी करताच सभागृहात उपस्थितांनी एकच जल्लोष करत आदित्य यांचे स्वागत केले. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाबाहेर जमलेले युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाके फोडून पेढेवाटत आनंदोत्सव साजरा केला.