होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

Published On: Apr 27 2018 1:39AM | Last Updated: Apr 27 2018 1:39AMठाणे : प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि इंटरनॅशनल ड्रग माफिया असलेल्या तिचा पती विकी गोस्वामीला ठाणे विशेष न्यायालयाने 2 हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणी फरार घोषित केल्यानंतर दोघांना एका महिन्याच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. पोलिसांसमोर हजर न झाल्यास दोन्ही आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात येईल, असेही न्यायालयाने एका नोटिसद्वारे बजावले होते. मात्र, या नोटीसला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील आरोपी पोलिसांसमोर हजर न झाल्यामुळे अखेर ठाणे न्यायालयाने त्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णीचे तीन फ्लॅट मुंबईतील वर्सोवा येथे आहेत. या फ्लॅटसह ममताची व विकीची गुजरात राज्यात अहमदाबाद व इतर ठिकाणी मोठी मालमत्ता आहे. ममता व विकीची भारतात कुठेकुठे मालमत्ता आहे याचे विवरण ठाणे पोलिसांनी मिळवले असून ही सर्व मालमत्ता ठाणे पोलीस लवकरच जप्त करू शकतात.

अजामीनपात्र वॉरण्ट बजावल्यानंतर ठाणे पोलिसांनी कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. एम. पटवर्धन यांनी ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी या दोघांना इफेड्रीनप्रकरणी आरोपी घोषित करत त्यांच्या अटकेचे अधिकार दिले होते. तसेच तीस दिवसांच्या आत ममता आणि विकी पोलिसांसमोर हजर न झाल्यास त्यांची भारतातील मालमत्ता जप्ती करण्यात यावी, असे आदेश ठाणे न्यायालयाने त्यावेळी दिले होते.

Tags : Mumbai, Actress Mamta Kulkarni, Property seized, order, Mumbai news,