Tue, Jul 16, 2019 22:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कास्टिंग काऊचमधून मीदेखील गेलेय!

कास्टिंग काऊचमधून मीदेखील गेलेय!

Published On: Apr 27 2018 1:44AM | Last Updated: Apr 27 2018 1:40AMमुंबई: प्रतिनिधी

कोरिओग्राफर सरोज खान यांनी बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवर वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव हिनेही चंदेरी दुनियेतील कास्टिंग काऊचचा पर्दाफाश केला आहे. बॉलिवूडमध्ये हा प्रकार कॉमन असल्याचे सांगतानाच ‘एका निर्मात्याने मला भूमिका देण्यासाठी सेक्सची मागणी केली होती,’ असा गौप्यस्फोटही उषाने केला.

‘बॉलिवूडस डर्टी सिक्रेट’ हा बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवर एक लघुपट  बीबीसी तयार करीत असून, त्यानिमित्त बीबीसीने उषा जाधव आणि राधिका आपटे यांची मते जाणून घेतली. राधिकाने बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊच होत असल्याचे ठासून सांगितले. ‘काही जणांना कलाविश्वात देव मानले जाते, त्यामुळे कोणी तोंड उघडत नाही. बॉलिवूडमधले करियर संपेल अशी भीती असते. हॉलिवूडमध्ये हे सगळे संपविण्यासाठी स्त्री आणि पुरुष कलाकारांनी निर्धार केला तसा आपल्याकडे व्हायला हवा,’असे मत राधिकाने व्यक्त केले. 

उषा जाधवनेही  चंदेरी दुनियेची ही काळी बाजू जगासमोर आणली. ‘सिनेमात काम करण्यासाठी मी घरातून पळून मुंबईला आले. मात्र इथे कास्टिंग एजंटकडून माझे अनेकदा लैंगिक शोषण झाले,’अशी धक्कादायक माहिती तिने दिली. 

‘एक अभिनेत्री म्हणून तुला केव्हाही आनंदाने लैंगिक संबंध ठेवावे लागतील, असे सांगताना तो  एजंट मला कुठेही स्पर्श करत होता आणि माझे चुंबन घेत होता. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता तुला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय की नाही, असा सवाल करत तुझा अ‍ॅटिट्यूड योग्य नसल्याचे तो म्हणाला,’ असेही उषाने सांगितले. 

उषा सांगते, बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच सामान्य आहे. बॉलिवूडमधील प्रस्थापितांकडून लैंगिक शोषण होणे ही बाब नित्याचीच आहे. तुला सिनेमात संधी दिली, तर त्याबदल्यात काय देशील? असे मला एकदा विचारण्यात आले. त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, असे मी त्यांना सांगितले. त्यावर तो म्हणाला, पैशाचा प्रश्नच नाही. जर निर्माता किंवा दिग्दर्शकाला तुझ्यासोबत झोपायचे असेल, मग तू काय करशील, असा सवालही त्याने मला विचारला.

Tags : Actor Usha Jadhav, exposed, casting Kaouch, Chanderi Duniya,