Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवाझुद्दीनच्या भावाची पोलिसांकडून चौकशी

नवाझुद्दीनच्या भावाची पोलिसांकडून चौकशी

Published On: Jun 04 2018 7:20PM | Last Updated: Jun 04 2018 7:20PMठाणे : खास प्रतिनिधी

पत्नीच्या मोबाईलचे बेकायदेशीर सीडीआर काढल्याप्रकरणी  बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धीकी याला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर त्याचा वकील रिजवान सिद्धीकीला अटक केली होती. या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून सिद्धीकीचा लहान भाऊ तथा दिग्दर्शक शमास नवाज सिद्धीकी याची सोमवारी दिवसभर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली. मात्र, शमास हा पोलिसांना सहकार्य करीत नसल्याने रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. पण, अद्याप त्याचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. 

नवाझुद्दीनने आपल्या वकिलामार्फत पत्नीचे सीडीआर काढल्याचा त्याच्यावर संशय होता. चौकशीअंती बेकायदेशीतरीत्या मोबाईल सीडीआर विकत घेतल्याच्या आरोपाखाली नवाझुद्दीनचे वकील रिझवान सिद्धीकी याला कारागृहात जावे लागले. सध्या त्याची जामिनावर सुटका झाली आहे. प्रत्यक्षात पोलिसांसमोर हजर न राहता नवाझुद्दीनने वकिलामार्फत आपला जबाब नोंदवला होता. 

भाऊ शमास याने वकील रिझवान याला नवाझुद्दीनच्या पत्नीचे सीडीआर काढण्यास सांगितल्याची माहिती पुढे आल्याने ठाणे पोलिसांनी शमसला चौकशीसाठी ठाण्यात हजर राहण्याचा समन्स बजावला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास शमास सिद्धीकी ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट एकच्या कार्यालयात दाखल झाला. त्याची प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. परंतु तो पोलिसांना चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सिद्धीकीची चौकशी सुरू होती.