Mon, May 20, 2019 10:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंदचा फटका मुंबईच्या लाईफलाईनला

बंदचा फटका मुंबईच्या लाईफलाईनला

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:25AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र बंदचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या तीनही मार्गावरील रेल्वेला बसला. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली तर मध्य रेल्वे काही वेळ बंद झाल्याने प्रवाशांनी रेल्वे रूळावरून चालत जाण्याचा मार्ग निवडला. आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर तीनही मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली.                       

आंदोलनामुळे रेल्वेचे प्रचंड नुकसान

आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन असणार्‍या तीनही मार्गावरील रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंदोलकांनी विक्रोळी स्थानकातील बेंच उखडून रुळावर टाकले. डोंबिवली व इतर अनेक ठिकाणी तिकीट खिडक्यांचे नुकसान करण्यात आले. जीआरपी आणि आरपीएफच्या जवानांनी रेल्वेच्या अखत्यारीत आंदोलन करणार्‍या अनेक आंदोलकांना बाहेर काढले. जीआरपी व आरपीएफने संयुक्त कारवाई करत 13 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. रेल्वेच्या नुकसान करणार्‍या बाकीच्या आंदोलकांना सीसीटीव्हीच्या साहाय्याने शोधून त्यांच्यावर जीआरपी व आयपीसी कायद्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पश्‍चिम रेल्वेने म्हटले आहे.          

आंदोलनाचा रेल्वेवर परिणाम 

नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे सायंकाळी 5 वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर एकूण 820 सेवा चालवण्यात येतात, मात्र आंदोलनामुळे एकूण 120 सेवा बुधवारी रद्द करण्यात आल्या. बाहेरगावी जाणार्‍या सर्व सेवा नियमित धावल्या. पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावणार्‍या सेवांपैकी एकूण 60 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. शिवाय एसी लोकलच्या 12 सेवांपैकी चार सेवा चालवण्यात आल्या तर एकूण 8 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. तर 200 हून अधिक लोकल सेवा धीम्यागतीने चालत होत्या.        

दरम्यान, सायंकाळी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर सायंकाळी 5 वाजल्यानंतर तीनही मार्गावरील रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असून चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी सोय झाली. शिवाय पूर्व द्रुतगती मार्गावरील व पश्‍चिम महामार्गावरील आंदोलनकर्ते हटवण्यात आल्यामुळे रस्ते वाहतूकही पूर्वपदावर यायला सुरुवात झाली.