Mon, May 20, 2019 07:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादरला रात्रीही होणार फेरीवाल्यांवर कारवाई

दादरला रात्रीही होणार फेरीवाल्यांवर कारवाई

Published On: Dec 03 2017 1:43AM | Last Updated: Dec 03 2017 1:25AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

दादर रेल्वे स्टेशनलगतच्या फेरीवाल्यांवर दिवसा कारवाई होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी फेरीवाले बसू लागले आहेत. याला आवर घालण्यासाठी पालिकेने रात्रीच्या वेळीही कारवाईचा निर्णय घेतला असून यासाठी चार परवाना निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. 

मुंबई शहरासह उपनगरात फेरीवाल्यांच्या विरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे स्टेशन व पादचारी पूल फेरीवालामुक्त झाले आहेत. पण सायंकाळनंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्या स्टेशन परिसरातून हटवल्यानंतर फेरीवाले विशेषत: खाद्यपदार्थांच्या गाड्या स्टेशनलगत लागत आहेत. दादर पश्‍चिमेला याची संख्या जास्त असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाबाहेरच वडे-भजी यांची विक्री करण्यात येत आहे. त्याशिवाय पुलाव, अंडा ऑम्लेट या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्याही लागत आहेत. केशवसुत उड्डाणपुलाच्या खाली फळविक्रेता, भाजी विक्रेता बसू लागले आहेत. परंतु याला रोखण्यात खासगी सुरक्षारक्षकही बिनकामाचे ठरले असून पोलीसही या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष करत त्यांना एकप्रकारे फेरीचा धंदा करण्यास प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेने आता या परिसरावर रात्रीच्या वेळीही कडक कारवाई करण्यासाठी परवाना निरीक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दादर रेल्वे स्थानकाबाहेर रात्री नऊ वाजता दुसर्‍या पाळीतील कर्मचार्‍यांची वेळ संपल्यानंतर फेरीवाले बसत आहेत. ही बाब आपल्या निदर्शनास आणून दिली असून यासाठी आपण 4 अतिरिक्त परवाना निरीक्षकांची संख्या वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड आणि उपायुक्त निधी चौधरी यांनी चार परवाना निरीक्षक देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार हे चार निरीक्षक आल्यानंतर रात्रीच्यावेळीही कडक कारवाई केली जाईल, असे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांनी सांगितले. सध्या जी-उत्तर विभागात 6 परवाना निरीक्षक आहेत. ही संख्या आता दहापर्यंत वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.