Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साप सोडण्याचा कट रचणार्‍यांचे संभाषण हाती : चंद्रकांत पाटील

साप सोडण्याचा कट रचणार्‍यांचे संभाषण हाती : चंद्रकांत पाटील

Published On: Jul 28 2018 2:01AM | Last Updated: Jul 28 2018 1:42AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

वारीमध्ये साप सोडून चंेगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचणार्‍यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश असून, त्यांचे संभाषण आमच्या हाती लागले आहे. या नेत्यांवर सरकारने कारवाई सुरू केली आहे, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचला असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्‍तव्यावरून मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती खरी असल्याचे सांगितले. 

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच सापसोडे म्हटले नाही. गुप्तचर विभागाकडून जी माहिती आली, त्याआधारे त्यांनी हे विधान केले होते. वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्यात घबराट निर्माण होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा न करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही मुख्यमंत्र्यांसाठी आषाढीची विठ्ठलाची महापूजा हा सन्मान असतो. मात्र, वारीत विघ्न नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावर पाणी सोडले.

मराठा समाजाला आरक्षण देणे हा आमचा राजकीय अजेंडा नाही, तर ती आमची निष्ठा आहे. विरोधी पक्षात असताना आम्ही मराठा आरक्षणाची मागणी करीत होतो. आता सत्तेत असताना आम्ही हे आरक्षण देण्याबाबत कटिबद्ध आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा वटहुकूम काढला. त्या वटहुकमाला न्यायालयाने स्थगिती दिली. आघाडी सरकार असतानाच न्यायालयात सुनावणी झाली होती. आमचे सरकार आल्यानंतर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला, असे सांगतानाच राज्य सरकार कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.