Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाण्याचा कौल शिवसेनेला; भाजप दुसर्‍या स्थानी

मुंबई, ठाण्याचा कौल शिवसेनेला; भाजप दुसर्‍या स्थानी

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:33AMमुंबई : दिलीप सपाटे 

2014 च्या निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यात शहरी मतदारांचा मोठा वाटा होता. मुंबई, ठाण्यात भाजपने अनपेक्षित यश मिळवीत विधानसभेत शंभरी पार केली होती. या शहरांमध्ये विरोधी पक्षांऐवजी भाजप, शिवसेना या मित्रपक्षांमध्येच खरी लढत रंगली होती. आता दै.पुढारीने केलेल्या सर्वेक्षणानुसार या महानगरांमध्ये ही कामगिरी कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असेल, असे स्पष्ट दिसते. मुंबई आणि ठाण्यात लोकांचा कौल शिवसेनेकडे झुकलेला आहे, तर भाजप दुसर्‍या स्थानी आहे.

या सर्वेक्षणात सर्व वयोगट, स्त्री-पुरुष वर्गाचा समावेश होता. त्यापैकी 55 टक्के लोक हे पदवीधर आहेत. सर्वेक्षण करताना सरकारी व खासगी नोकरदार, व्यापारी व व्यावसायिक आणि बेकारांचाही समावेश होता. 2014 च्या निवडणुकीत मुंबईत 36 जागांपैकी 15 जागा जिंकून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. शिवसेनेने 14 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ 5 जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादीला मुंबईत एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे 36 पैकी युतीने 29 जागा जिंकून मुंबईवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. 

ठाणे महापालिकेतील चारपैकी तीन जागा युतीने जिंकल्या. मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवलीतही युतीने अशीच मुसंडी मारली. नवी मुंबईत भाजपने खाते उघडत माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव शक्य करून दाखविला. 

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुख्य लढत ही भाजप आणि शिवसेनेतच रंगली होती. हीच कामगिरी भाजपला सत्तेपर्यंत घेऊन गेली. येणार्‍या काळातही मुंबई, ठाण्यात सत्तेतील या दोन भिडूंमध्ये लढत रंगण्याची शक्यता आहे.

सर्व्हेेत शहरी मतदारवर्गातील अस्वस्थताही अधोरेखित झाली आहे. मुंबई व ठाणे ही महानगरे बहुभाषिक आहेत. येथे मराठी मतदारांपेक्षा अनेक मतदारसंघांवर अन्य भाषिकांचाही वरचष्मा आहे. उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी यांची संख्या मोठी आहे. या मतदारांनी मागील निवडणुकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई असो की कल्याण-डोंबिवली, येथे भाजपला साथ दिली. या निवडणुकीत मुंबईतील उत्तर भारतीय वोटबँक काँग्रेसच्या हातातून पूर्णपणे सटकल्याचे दिसून आले. मात्र सर्वेक्षणानुसार भाजपला 23 टक्के, तर शिवसेनेला 29 टक्के मतदारांनी पसंती दर्शविली आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरांतील प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध प्रकल्पांना गती दिली आहे. मेट्रो प्रकल्पांचे जाळे मुंबईत तयार होत असून ते उपनगरांसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि भिवंडीपर्यंत विस्तारले जाणार आहे. पुण्यातही मेट्रोचे काम सुरू आहे. समृध्दी मार्गाचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाला गती देण्यात आली आहे. तरीही लोक पुरेसे समाधानी नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सत्तेतील दोन पक्षांमध्ये लढतीची शक्यता असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पिछाडीवरच आहे. मात्र सरकारच्या कामगिरीवर सर्वेक्षणात नाराजीही प्रकट झाली आहे.

याचे कारण शहरातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय, व्यापारी, तरुण वर्ग, ज्यांनी 2014 ला मोदीलाटेत राज्यातही भाजप सरकार आणले तो वर्ग आज अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात जलयुक्त शिवारसारख्या योजनेची प्रशंसा करतानाच तेथे होणार्‍या शेतकरी आत्महत्यांबाबतही महानगरांतील हा मतदार चिंतेत आहे. शिवाय त्याला नोटाबंदी, जीएसटीचीही झळ बसल्याचे सर्व्हे सांगतो. राज्य सरकार इज ऑफ डुईंग बिझनेस, मेक इन महाराष्ट्र या माध्यमातून उद्योगधंदे वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याचे दृश्य परिणाम दिसून येत नाहीत. राज्य सरकारचा सेवाहमी कायदा असो, स्टार्टअप योजना असो की कौशल्य विकास, या योजनांचा दाव्यांप्रमाणे दृश्य परिणाम दिसून आलेला नाही. 

सरकारी कार्यालयांतील वातावरणातही फारसा परिणाम झालेला नाही. बेरोजगारीची समस्या कमी करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे 

सर्व्हेत नाराजीचा सूर दिसून आला आहे. मात्र, जमेची बाजू ही की महानगरांतील मतदारांना या परिस्थितीतही भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हवे आहेत. 27 टक्के मतदारांना पुन्हा तेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. त्याचवेळी  25 टक्के लोकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. 10 टक्के लोकांना पृथ्वीराज चव्हाण, तर 15 टक्के लोकांना राज ठाकरे हे मुख्यमंत्री हवे आहेत.

पक्षांचा विचार केला तर आता मतदान झाल्यास  23 टक्के लोक हे भाजपला मतदान करण्यास उत्सुक आहेत. शिवसेनेला 29 टक्के लोकांनी सर्वाधिक पसंती दाखविली आहे. त्यामुळे भाजपला शिवसेना भारी पडण्याची शक्यता आहे.तर 12 टक्के लोकांनी काँग्रेसला पसंती दिली आहे. महानगरांतील कल पाहता युतीच्या मतांची बेरीज 52 टक्के, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून मतांची टक्केवारी 24 टक्के होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्यास उत्सुक आहे. ही आघाडी झाली तरी युतीपुढे ते तोलामोलाचे आव्हान उभे करतील की नाही याबाबत या सर्व्हेत प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शहरातील बहुभाषिक मतदार काय करतो यावरही पुढील निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.गेल्या निवडणुकीत तो भाजपच्या मागे उभा राहिला. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात भाजप अव्वल राहिला. मात्र, सर्व्हेचे अंदाज पाहता ही कामगिरी कायम ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.

Tags : Mumbai, Thane, Election, pudhari survey,