Tue, Jul 23, 2019 06:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत मिरवणुकीसाठी जाणार्‍या दोन शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू

भिवंडीत मिरवणुकीसाठी जाणार्‍या दोन शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:02AM

बुकमार्क करा

भिवंडी : वार्ताहर 

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या विजयाची घोषणा होताच रॅलीची तयारी करण्यासाठी निघालेल्या दोन कार्यकर्त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. समोरून येणार्‍या ट्रकवर स्विफ्ट कार जोरदार धडकल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली पाड्यानजीक गुरुवारी हा अपघात झाला. अजय गुळवी (17) आणि राकेश गुळवी (20) अशी मृतांची नावे असून हे दोघेही भिवंडी तालुक्यातील निबंवली गावचे राहणारे होते.

ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवार उज्वला गुळवी विजयी झाल्या. त्यांच्या विजयाच्या रॅलीची तयारी करण्यासाठी अजय आणि राकेश हे कामतघर येथून स्विफ्ट कारने निंबवली गावात येण्यासाठी निघाले होते. सरवली पाड्यानजीक त्यांची कार भरधाव वेगाने येत असताना चालक राकेश याचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकून कार विरुद्ध दिशेने येणार्‍या एका भरधाव ट्रकवर आदळली. त्यात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून अजय व राकेश यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोघांचे मृतदेह भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी कोनगांवच्या लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उज्वला गणेश गुळवी यांनी विजयी रॅली रद्द करून मृत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.