Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘त्या’ अपघातातील जखमी शैलेश मदतीच्या प्रतीक्षेत 

‘त्या’ अपघातातील जखमी शैलेश मदतीच्या प्रतीक्षेत 

Published On: Mar 01 2018 1:52AM | Last Updated: Mar 01 2018 1:35AMवाडा : मच्छिंद्र आगीवले 

वाडा शहरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत 5 डिसेंबर 2016 रोजी गेट अंगावर कोसळून अपघात झाला होता. ज्यात तन्वी धानवा या दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर शैलेश चव्हाण हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. या अपघाताच्या जवळपास दीड वर्षानंतरही शैलेश चव्हाण या  दुसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्याची प्रकृती अद्याप ठिक नसून, घटना आठवली की आजही अंगाचा थरकाप उडतो. त्यातच शासनाने तोकड्या मदतीनंतर आपले हात वर केले असल्याने आता या विद्यार्थ्यावर उपचार करणे पालकांच्या नाकीनऊ आले आहे.सोबत विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्यही सध्या तरी अंधारात आहे.

वाडा शहरातील जिल्हा परिषद शाळेत 5 डिसेंबर 2016 रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत शाळेमागे असलेल्या पडक्या व धोकादायक गेटवर खेळत असताना ते गेट अचानक कोसळले. ज्यात असलेल्या बांधकामाचा मार लागून तन्वी धानवा या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीत शिकत असलेल्या शैलेश चव्हाण याला जबर दुखापत झाली. त्याला तात्काळ ठाणे येथे उपचारासाठी नेण्यात आले व पुढे जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. या विद्यार्थ्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्याने त्यावर अनेकदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र अद्यापही त्याच्या प्रकृतीत हवीतशी सुधारणा झालेली नाही.

या अपघातानंतर जिल्हा परिषदेने शैलेशच्या पालकांना 40 हजार व अन्य निधीतून 15 हजार असे 55 हजार रुपये मदत म्हणून दिले. शिवाय शिक्षकांना दोषी पकडून कारवाईही करण्यात आली. कुण्या एखाद्या योजनेतून विमा रक्कम मिळवून देऊ, असे आश्वासन देत तत्कालीन सीईओ निधी चौधरी यांनी विद्यार्थ्याची भेट घेतली होती, असे पालकांनी सांगितले. दीड वर्षात आजपर्यंत उपचारावर जवळपास 4 लाखांचा खर्च करण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. अद्याप शैलेश आपल्या पायांवर नीट चालत नसून त्याच्यावर उपचार सुरूच आहेत. मात्र, आता हा खर्च पेलणे पालकांना जड जात  आहे. 

शैलेश हा मूळचा चाळीसगाव येथील रहिवासी असून वडील एक कारखान्यात कामाला होते. मात्र त्यांचा हा कारखाना बंद झाल्याने ते एका दुकानात काम करतात व आई शाळेत काम करते. मुलांना उज्वल भविष्य देण्याच्या उद्देशाने वाड्यात आलेल्या या चव्हाण कुटुंबाला या वादळाने पार झोडपून टाकले असून शैलेशचे दीड वर्षाचे न भरून येणारे शैक्षणिक, शारीरिक व मानसिक नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.