होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निम्मे शुल्क  घ्या, प्रवेश द्या

निम्मे शुल्क  घ्या, प्रवेश द्या

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:54AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

कृषी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन 2018-19 या वर्षासाठी प्रवेश घेणार्‍या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येते. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी अशा विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काच्या पन्नास टक्केच रक्कम घेण्याचे निर्देश राज्यातील  शिक्षण संस्थांना देण्यात आले आहेत. शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम घेऊन प्रवेश न देणार्‍या अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेणार्‍या शिक्षण संस्थांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

कृषी, वैद्यकीय आदी विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा विशेषतः मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. यामध्ये अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम ही राज्य सरकार भरणार असून ती रक्कम संबंधित महाविद्यालयांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शिक्षण शुल्काच्या फक्त पन्नास टक्के रक्कम घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मात्र, काही संस्था, महाविद्यालये असे प्रवेश देत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांना सूचना देण्याचे निर्देश तंत्र शिक्षण संचालनालयास दिले.

 महसूलमंत्री तथा मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्यांच्या उत्पन्न आठ लाख रुपयांच्याआत आहे अशांच्या पाल्यांना निम्मे शुल्क आकारुन प्रवेश देण्याचे आदेेश राज्य सरकारने काढले आहेत. मात्र, तरीदेखील काही महाविद्यालये त्याचे पालन करीत नसल्याने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.