Wed, Aug 21, 2019 01:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपहरण : पैसे उकळण्यासाठी पोलिसाचा अजब धंदा !

अपहरण : पैसे उकळण्यासाठी पोलिसाचा अजब धंदा !

Published On: Jul 13 2018 1:24AM | Last Updated: Jul 13 2018 12:58AMठाणे : प्रतिनिधी

नंदूरबार जिल्ह्यातील अक्‍कलकुवा येथील व्यापार्‍याच्या रिजवान मेमन (22) या मुलाला एका महिलेच्या मदतीने ठाण्यात बोलावून त्याचे पैशासाठी अपहरण करणार्‍या वर्तकनगर पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल दीपक वैरागडे (33) याचे अनेक कारनामे उघड होऊ लागले असून त्याने या पूर्वीदेखील अनेकांना याच पद्धतीने गंडवले असल्याची प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. दरम्यान, वैरागडेच्या कारनाम्यात त्यास एका पोलीस अधिकार्‍याची साथ मिळत होती, असे खात्रीलायक वृत्त असून पोलिसांची बदनामी टाळण्यासाठी आधीच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असताना त्या अधिकार्‍याचे नाव समोर येईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या प्रकरणातील वैरागडे आणि त्याचा साथीदार सोहेल राजपूत या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली.  सुरुवातीला हे प्रकरण काशिमिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. परंतु, या गुन्ह्याची  सुरुवात येऊरच्या एका  बंगल्यातून झाल्यामुळे हे प्रकरण बुधवारी वर्तकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, पोलिसाचाच या प्रकरणात सहभाग असल्याने हे प्रकरण दाखल करून घेण्यास वर्तकनगर पोलिसांनी नकार दर्शवला होता. तर हे प्रकरण बाहेर येऊच नये म्हणून देखील पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. मात्र ठाणे ग्रामीण पोलिसांनी सरळ काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून टाकल्याने अखेर हे प्रकरण समोर आले. या घटनेतला मुख्य सूत्रधार असलेला पोलीस कॉन्स्टेबल दीपक वैरागडे याने यापूर्वीदेखील अनेकांना याच पद्धतीने गंडवले असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. 

वैरागडे हा काही महिलांना हाताशी धरून त्यांना बड्या व्यापारी अथवा श्रीमंतांच्या मुलांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ओळख वाढवायला लावायचा. त्यानंतर या महिला आपल्या सावजांना ठाण्यात बोलावून उपवन आणि येऊरच्या परिसरात घेऊन जात असत. येथे गेल्यावर या महिला आपल्या सावजासोबत एका खोलीत जात आणि शरीरसंबंधाची मागणी करत. दरम्यान महिला आपल्या सावजा सोबत खोलीत गेल्या की वैरागडेला मोबाईल वरून मिसकॉल देऊन संकेत दिला जायचा. त्याचवेळी वैरागडे हा घटनास्थळी येऊन रेड पडली असल्याचे नाटक करत आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मोठ्या रकमेची मागणी करायचा. त्याने यापूर्वी अशाच प्रकारे तीन बड्या श्रीमंतांच्या मुलांकडून मोठी रक्कम वसूल केल्याची चर्चा आहे. वैरागडेच्या या काळ्या कारनाम्यात एका पोलीस अधिकार्‍याचीदेखील त्यास साथ मिळत होती. या अधिकार्‍याच्या मार्गदर्शनानुसारच तो आपल्या सावजांना हेरून त्यांना ब्लॅकमेल करीत होता असे समजते. त्या वरिष्ठ अधिकार्‍याचे नाव उघड होईल का? आणि त्याच्यावरदेखील कारवाई होईल का? या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रिजवानला असे अडकवले जाळ्यात

1 वैरागडे हा पैसे उकळण्यासाठी नेहमी नव्या सावजाच्या शोधात असायचा. याच दरम्यान त्याची ओळख राबोडीत राहणार्‍या सोहेल राजपूत या तरुणाशी झाली. त्यानंतर वैरागडे याने सोहेलला त्याच्या काळ्या धंद्यात ओढले. तुझे कोणी श्रीमंत मित्र असतील तर त्यांना आपण गंडवून चांगली रक्कम वसूल करू शकतो अशी कल्पना वैरागडे याने सोहेलच्या समोर ठेवली आणि तेथूनच सुरू झाला व्यापार्‍याच्या मुलाला अडकवण्याचा प्लॅन. सोहेलने तीन वर्षापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या  रिजवान मेमन या सायकल व्यापार्‍याच्या मुलाशी त्याची ओळख झाली होती.
रिजवानचा मोबाईल नंबर वैरागडे व सोहेल यांनी आयशा खान नामक एका तरुणीला देऊन त्याच्याशी मोबाईलवर चॅटिंग करून त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढण्यास सांगितले. तो जाळ्यात अडकल्यानंतर त्याच्याकडून पैसे काढण्याचा प्लॅन वैरागडे आणि सोहेलचे आधीच ठरले होते. त्यानुसार 9 जुलै रोजी सुरत येथे गेलेल्या रिजवानला ठाण्यात येण्यास तिने भाग पाडले. ठाण्यात आल्यानंतर हे दोघेही एका मॉलमध्ये फिरले. नंतर एका रिक्षातून दोघेही येऊरला गेले. तिथे एका बंगल्यावर रिजवानला तिने शरीरसंबंधासाठी गळ घातली. त्यासाठी ते एका खोलीत शिरल्यानंतर तिथे वर्तकनगर पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल वैरागडे याने रेड पडली असल्याचे नाट्य वठविले. तुम्ही इथे काय करता? तू मुलीशी शारीरिक संबंध बनवले असून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो? असे तो रिजवानला सांगत असतांनाच तिथे आणखी दोघे जण आले. वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिला तक्रार देण्यास सांगण्यात आले. 

3 वैरागडे आणि त्याच्या साथीदारांनी रिजवानला वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणले. त्याला बाहेरच थांबवून तक्रार दाखल करण्याचे नाट्यही वठविले. तेव्हा रिजवानने राबोडीतील त्याचा पूर्वीचा वर्गमित्र सोहेल यास बोलविले. मात्र आधीच या कटात सहभागी असलेल्या सोहेलने सेटिंग करून देतो, असे सांगत 15 लाखातून 10 लाखांवर मॅटर सेटल केले. दरम्यान, रिजवानकडे सतत पैशांची मागणी करीत त्याला काल्हेर (भिवंडीतील) एका लॉजवर त्यांनी डांबून ठेवले.  रिजवानने अक्कलकुवा येथे आपले वडील अब्दुल रहिम मेमन आणि काही नातेवाईकांना ही आपबिती फोनवरून कथन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले. मुलाने सांगितल्याप्रमाणे काशिमिरा भागातील फाऊंटन हॉटेलवर ते 10 जुलै रोजी दुपारी आले. 

4 आपल्या मुलाला पोलीस असल्याच्या नावाखाली कोणी तरी डांबून ठेवल्याचे अब्दुल यांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) काशिमिरा युनिटच्या अधिकार्‍यांना सांगितले. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वैरागडे आणि सोहेल यांना अखेर मानपाडा उड्डाणपुलाच्या परिसरातून मंगळवारी दुपारी  2 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. मधल्या काळात त्यांनी रिजवानकडून उकळलेल्या दोन लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये आणि त्यांचे दोन मोबाईल त्यांच्याकडून हस्तगत केले. त्यांना रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अटक केल्यानंतर पहाटे 2 वाजता वर्तकनगर पोलिसांकडे ही केस सुपूर्द केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली.