Sun, Nov 18, 2018 20:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैभव राऊतच्या घरी पुन्हा एटीएसची धाड; इनोव्हा कार जप्त

वैभव राऊतच्या घरी पुन्हा एटीएसची धाड; इनोव्हा कार जप्त

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 15 2018 11:07PMनालासोपारा :  वार्ताहर

नालासोपारा पश्चिमेतील भंडार आळीतील हिंदुत्ववादी संघनटेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरी बुधवारी  दुपारी साडेतीनच्या सुमारास पुन्हा एटीएसने धाड टाकून तो राहत असलेल्या मजल्यावरील एका खोलीत नेऊन त्याची सुमारे अर्धा तास चौकशी केली. त्यानंतर त्याची इनोव्हा कारही ताब्यात घेण्यात आली. एटीएसच्या पथकाने कोणतीही माहिती देण्यास नकार देऊन वैभवला मुंबईला घेऊन गेले. दरम्यान, त्याला पुन्हा घरी आणल्याची बातमी परिसरात पसरताच त्याच्या समर्थनासाठी स्थानिक ग्रामस्थ जमा झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

दरम्यान, एटीएसने आदेशाचे वॉरन्ट न दाखवता आमच्या घरी येऊन गाडीचे पेपर आणि गाडी घेवून गेले. त्याची पोचपावती सुद्धा दिली नाही तसेच आम्हाला वैभवशी बोलू दिले नाही, अशी माहिती वैभवची पत्नी लक्ष्मी यांनी दिली. एटीएस नेमके काय करत आहे, हेच समजत नाही असे त्या म्हणाल्या.

एटीएसने तपासादरम्यान वेगवेगळी माहिती दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. कधी 8 बॉम्ब, कधी 20,30,50 बॉम्ब पिस्तुले सापडल्याचे एटीएस सांगते. एकदाच छापा मारल्यावर वेगवेगळी आकडेवारी कशी ? त्यामुळे स्थानिकांच्या मनात संभ्रम निर्माण निर्माण झाला, अशी प्रतिक्रिया येथील रहिवासी दिप्तेश पाटील यांनी दिली.