Mon, Mar 18, 2019 19:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहायक कर आयुक्तासह माजी उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात

सहायक कर आयुक्तासह माजी उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी

कारवाईच्या वेळी कंपनीला केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून 2 कोटी रुपयांची लाच मागणारे सहायक राज्य कर आयुक्त सोपान रामभाऊ सुर्यवंशी आणि माजी विक्रीकर उपायुक्त डि. व्ही. रेठरेकर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले आहेत. एसीबीने दोघांविरोधातही गुन्हा दाखल करुन तपास सुरु केल्याने राज्यकर विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॅकनेली भारत इंजिनियरींग ली. कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयामध्ये राज्यकर विभागाच्या पथकाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2016 मध्ये छापा मारला होता. या पथकामध्ये लाचखोर सुर्यवंशी हा सहायक म्हणून होता. पथकाने केलेल्या तपासणीनंतर कंपनीच्या 2011 ते 2016 या कालावधीत व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स रिटर्नमध्ये दोष काढले. तसेच कंपनीला 3 कोटी 55 लाखांचा अतिरीक्त कर लावला होता. त्यावेळी कंपनीचे नवनियुक्त कायदेसल्लागार असलेल्या माजी विक्रीकर उपायुक्त रेठरेकर यांनी हा टॅक्स भरण्याचा कंपनीला सल्ला दिला होता. त्याप्रमाणे कंपनीने हा अतिरिक्त करही भरला.

कारवाईला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर 6 नोव्हेंबर 2017 रोजी लाचखोर सुर्यंवशी याने त्याच्या मोबाईलवरुन कंपनीच्या उपाध्यक्षांना मॅसेज पाठवून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहाण्यास सांगितले. तसेच कंपनीच्या अन्य संचालकांची माहिती पाठवून त्यांनाही चौकशीसाठी हजर राहाण्यास बजावले. त्यानंतर 9 तारखेपासून 20 तारखेपर्यंत लाचखोर सुर्यंवशी आणि रेठरेकर यांनी कारवाई करत असल्याचे भासवून मागील कारवाईत केलेल्या मदतीच्या बदल्यात 2 कोटी रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास कंपनीच्या संचाकांना कार्यालायात बोलावून कारवाई केली जाईल, अशी धमकीसुद्धा दिली. 

लाचेची मागणी होताच कंपनीने एसीबीचे मुख्यालय गाठून तक्रार दिली. यातक्रारीवरुन एसीबीने तपास केला असता दोन्ही लाचखोर पैशांची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. अखेर याप्रकरणी दोन्ही लाचखोरांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आल्याचे एसीबीने सांगितले.

सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

सहकारी सोसायटीच्या डिम्ड कनव्हेन्ससाठी समोरच्या पक्षाला नोटीस काढावी म्हणून 25 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहायक निबंधक विजयसिंह गवळी (46) याला बुधवारी रंगेहाथ अटक केली. गवळी याच्या अटकेनंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या घर आणि कार्यालयात झडती सुरु केली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सहकारी सोसायट्यांची हस्तांतरणाची कामे करतात. त्यांना बोरीवली पश्‍चिमेकडील एका सोसायटीने डिम्ड कनव्हेन्स करण्यासाठी कुलमुख्त्यार पत्र दिले. त्यानुसार तक्रारदार यांनी डिम्ड कनव्हेन्ससाठी ऑनलाईन अर्ज केला. या अर्जाच्या अनुषंघाने तक्रारदार यांनी दादर पश्‍चिमेकडील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयातील लाचखोर सहायक निबंधक गवळी याची भेट घेतली. तक्रारदार हे भेटीला येताच गवळीने समोरच्या पक्षाला नोटीस काढण्यासाठी त्यांच्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी होताच तक्रारदार यांनी एसीबी मुख्यालय गाठून तक्रार दिली.