Sun, May 26, 2019 20:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळयात

लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळयात

Published On: Jan 07 2018 9:57AM | Last Updated: Jan 07 2018 10:16AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्‍या गुन्ह्यामध्ये हत्येच्या प्रयत्नाचे कलम वाढ करण्याची धमकी देत, आरोपी तरुणाकडे लाच मागणारा मेघवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. संदिप राणुजी बढे (वय, ३५ ) असे लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्यात सापळा रचून दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. 

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ३८ वर्षीय तरुणाविरोधात मेघवाडी पोलिस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास करत असलेल्या बढे याने संबंधीत तरुणाला बोलावून घेतले. गुन्ह्यातील भादंवी कलम ३२६ मध्ये वाढ करून हत्येच्या प्रयत्नाचे ३०७ हे कलम वाढ न करण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. 

पोलिस अधिकाऱ्याने लाच मागताच या तरुणाने एसीबीचे मुख्यालय गाठून तक्रार दिली. तक्रारिवरून एसीबीच्या पथकाने केलेल्या तपासात लाचखोर बढे पैशांची मागणी करत असल्याचे उघड झाले. त्‍यानुसार एसीबीच्या पथकाने रविवारी सकाळी पोलिस ठाण्यात सापळा रचून लाचेच्या रकमेचा दहा हजार रुपयांचा पाहिला हप्ता घेताना बढे याला अटक केली.