मुंबई : प्रतिनिधी
डिसेंबर 2017 मध्ये वाजतगाजत मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिणामी आठ महिन्यांत वातानुकूलित लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात सुमारे नऊ कोटींची भर पडली.
देशातील पहिली वातानुकूलित लोकल गतवर्षी 25 डिसेंबरचा मुहूर्त गाठत मुंबईकरांच्या सेवेत आली. मात्र, सुरुवातीला मुंबईकरांकडून लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मागील दोन महिन्यांपासून एसी लोकलला मुंबईकरांनी चांगली पसंती दिली.
25 डिसेंबर 2017 ते जुलै 2018 पर्यंत 22 लाख 40 हजार 462 प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला. त्यातून 9 कोटी 35 लाख 4 हजार 781 रुपयांचा नफा पश्चिम रेल्वेला झाला आहे. यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास प्रवाशांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकेल अशी अपेक्षा जनसंपर्क अधिकारी गजानन महापुतकर यांनी व्यक्त केली.
सध्या एसी लोकलच्या दिवसाला 12 फेर्या चालवल्या जातात. दरदिवशी जवळपास 15 हजार 666 प्रवासी प्रवास करतात. आतापर्यंत 9.35 कोटी रुपये इतका फायदा तिकीट, सीझन पास यातून पश्चिम रेल्वेला झाला आहे. पश्चिम रेल्वेवर संध्याकाळी 7.49 या वेळेत चर्चगेट ते विरार या दरम्यान धावणार्या फेरीला सर्वात जास्त प्रवासीसंख्या लाभत आहे. जवळपास 11 हजार प्रवासी या फेरीत प्रवास करतात, असेही पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.