होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

Published On: Feb 08 2018 6:31PM | Last Updated: Feb 08 2018 8:29PMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर मंत्रालयात आत्महत्या आणि आत्महत्येच्या प्रयत्नांचे सत्र सुरु झाले असून, चेंबूर येथील हर्षल रावते (वय 44) या जन्मठेपेच्या कैद्याने गुरुवारी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तो पैठणच्या खुल्या कारागृहात मेव्हणीच्या खून प्रकरणी गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. गुरुवारी त्याचा पॅरोलचा शेवटचा दिवस होता. शुक्रवारी त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागणार होते. हा पॅरोल वाढवून घेण्यासाठी तो मंत्रालयात आला होता. 

धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राषन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर दोन जणांना आत्महत्येचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले असताना आत्महत्येची आणखी एक घटना घडल्याने सरकार आणि सुरक्षा यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. या घटनेनंतर मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली जाण्याची शक्यता आहे. 

हर्षल रावते हा चेंबूर येथील रहिवासी आहे. त्याला खुनाच्या गुन्ह्यात 14 वषार्ंची शिक्षाही झाली आहे. तो पॅरोलवर बाहेर आला होता. पाचव्या मजल्यावर विधी व न्याय विभाग आहे. तो आपला पॅरोल वाढवून घेण्यासाठी तेथे आला असावा. त्याच्याकडे सध्यातरी कोणतेही निवेदन अथवा चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली, त्याने आत्महत्या केली की तो खाली पडला याचा तपास पोलीस करीत आहेत. 

...आणि विरोधक नरमले 

या घटनेची माहिती वार्‍यासारखी मंत्रालयात पसरली. अधिकारी, कर्मचारी आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली असतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री जयंत पाटील हे घटनास्थळी आले. थोड्याच वेळात विधानसभेचेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही मंत्रालयात दाखल झाले. राज्य सरकारवरील जनतेचा विश्‍वास उडाल्याने लोक मंत्रालयात येउन आत्महत्या करीत असल्याची प्रतिक्रीया अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिली.

त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना धारेवर धरत या तरुणाने उडी का मारली? याची माहिती विचारयला सुरुवात केली. मात्र, या घटनेने भांबावलेले पोलिस अधिकारी माहिती देत नसल्याने त्यांनी थेट पोलिस उपायुक्त प्रशांत खैर यांचे मंत्रालयातील कार्यालयात गाठले व हर्षल रावते याची जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तपासायला सुरुवात केली. 

या कागदपत्रातून काहीही स्पष्ट होत नसल्याने अजित पवार यांनी सदर तरुणाच्या वडीलाशी संपर्क साधल्यानंतर तो एका खुनातील आरोप असल्याचे समोर आल्यानंतर आक्रमक विरोधक काहीसे शांत झाले.

हर्षल रावतेने केला होता मेहुणीचा खून 

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करणार्‍या हर्षल रावते याने 2003 मध्ये आपल्या मेहुणीचा खून केला होता. या प्रकरणी ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात त्याला 14 वर्षाची शिक्षा झाली होती. तो फेर्लोवर रजेवर होता आणि त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागेल या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. 

हर्षल रावते याची बहिण सुवर्णा मंगेश कदम ही कळवा येथे रहात होती. त्याने साडूला नोकरीला लावतो म्हणून त्यांच्याकडून 80 हजार रुपये घेतले होते. मात्र, पैसे देउनही आपल्या नवर्‍याला नोकरी न लावल्याने सुवर्णाने पैशांसाठी तगदा लावला होता. त्यामुळे संतप्त होउन हर्षल रावते याने तीची हत्या केली होती. हा गुन्हा सिध्द झाल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.