Tue, Apr 23, 2019 01:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; तीन ठार

तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; तीन ठार

Published On: Mar 10 2018 2:16AM | Last Updated: Mar 10 2018 2:01AMबोईसर : वार्ताहर 

तारापूर औद्योगिक परिसरातील नेव्हफाईन या रासायनिक कारखान्यात गुरुवारी रात्री 11.15 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की 15 किलोमीटरवरील गावांना मोठा हादरा बसला. त्यानंतर बाजूच्या पाच कंपन्यांना आग लागून तिघा कामगारांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले. आगीचे लोण पसरत असल्याने तारापूर एमआयडीसी, डहाणू, पालघर, विराज कंपनी, वसई अग्निशमन दलाच्या सात-आठ गाड्या शुक्रवारी सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम करत होते. औद्योगिक सुरक्षा सप्ताह सुरू असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे  मआयडीसीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

तारापूर एमआयडीसीमधील नेव्हफाईन कारखान्यामधील कंडेन्सरचा रात्री स्फोट होऊन आग लागली. त्यानंतर कारखान्यातील आठ रिअ‍ॅक्टर फुटले. पहिल्या स्फोटचा हादरा एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या गावांना भूकंप झाल्यासारखे वाटले. त्यानंतर कारखान्यांमध्ये लागोपाठ 18 स्फोट झाले. त्यामुळे नेव्हफाईनच्या बाजूला असलेल्या आरती ड्रग्स कारखान्याची संरक्षक भिंत तुटून त्याच्या वरच्या भागाला आग लागली. या आगीत जानू शिवमुरत आगरिया, पिंटू जवाहरलाल गौतम आणि आलोकनाथ सतंयलाला आगरिया या तीन कामगारांचा मृत्यू झाला. नेव्हफाईनच्या आजूबाजूला असलेल्या युनिमक्स, दरबारी इंडस्ट्रीज, भारत रसायन, प्राची या कारखान्यांनाही आग लागल्याने पहाटे 3 वाजेपर्यंत  जोरदार स्फोट  होत होते. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की लांबच्या इमारतीवरून देखील आग दिसत होती. या आगीत नेव्हफाईन हा कारखाना जाळून खाक झाला. तर पाच कंपन्यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. आग आणि धुरामुळे येथील परिसर काळा झाला आहे. 

आगीचे वृत्त कळताच बोईसरचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कामगारांना सुरक्षित स्थळी हलवले. तर, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच शासकीय यंत्रणा कमी पडता कामा नये, असे आदेश दिले. ही आग कशी लागली याची चौकशी सुरू आहे.