Wed, Mar 20, 2019 12:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिघडलेले विमान उडवणार्‍या यू वाय कंपनीचे हात वर

बिघडलेले विमान उडवणार्‍या यू वाय कंपनीचे हात वर

Published On: Jun 30 2018 1:43AM | Last Updated: Jun 30 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी    

घाटकोपर येथे कोसळलेल्या विमानातील वैमानिकांशी एअर ट्रॅफिक कंट्रोलने संपर्क केला. मात्र संपर्कच होऊ शकला नाही, असे सांगत यू. वाय. एव्हिएशन कंपनीने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. या विमानाने टेक ऑफ केले, त्यानंतर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही या सूचनाही दिल्या की विमान कोसळू शकते, इमारतींवर आदळू शकते पण वैमानिकांशी संपर्कच होऊ शकला नाही, असे जुहू आणि सांताक्रूझ येथील एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. 

12 सीटचे हे विमान गुरुवारी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर कोसळले. या घटनेत वैमानिक मारिया झुबेरी, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद दुबे यांचाही दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी वैमानिक मारिया झुबेरी यांचे पती अ‍ॅड. प्रभात कथुरिया यांनी यू. वाय. एव्हिएशन कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. एक हजार किलोमीटरहून अधिक तास विमान उडविण्याचा अनुभव मारिया यांच्या पाठीशी असताना गुरुवारी .विमान उडवण्यास तिने नकार दिला होता. तसे त्यांनी आपल्याला सांगितले होते. शिवाय राजपूत यांनीही हवामान खराब असल्याने चाचणी घेण्यात येऊ नये, अशी सूचना व्यवस्थापनाला केली होती. मात्र व्यवस्थापनाने केवळ स्वार्थापोटी त्यांच्या सूचना धुडकावून लावत उड्डाण करण्यास सांगितले,  असा गंभीर आरोपही कथुरिया यांनी केला आहे. कंपनीने जबरदस्तीने उड्डाण करण्यास भाग पाडले असा आरोप कंपनीने खोडून काढला आहे. मारियाने असे काहीही सांगितले नव्हते. वैमानिक मारिया आणि इतर कर्मचार्‍यांनी विमान टेक ऑफ करण्याआधी त्याची पूजा केली होती असे कंपनीचे मुख्य सुरक्षा अधिकारी संतोष पांडे म्हणाले.

यु. वाय. कंपनीच्या आग्रहाखातर मारियाने सकाळी आठ वाजताच घर सोडले. विमान चाचणीसाठी दोन तासांचा वेळ आवश्यक असतो. दोन तासांनी मारियाचा मेसेज न आल्याने प्रभात यांनी मारियाला मेसेज करुन कुठे असल्याचे विचारले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने काही विपरीत तर  घडले नाही ना अशी काळजी वाटू लागल्याने त्यांनी यु. वाय. कंपनीत फोन  केला. मात्र तिकडून सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही आणि काही वेळातच विमान दुर्घटनेची बातमी टिव्ही वर पाहिल्यानंतर थेट राजावाडी रुग्णालयात धाव घेतल्याचे  सांगितले. - अ‍ॅड. प्रभात कथुरिया, मारियाचे पतीं