होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घाटकोपर अपघात: पायलट मरियांच्या शौर्याला सलाम

घाटकोपर अपघात: पायलट मरियांच्या शौर्याला सलाम

Published On: Jun 28 2018 3:44PM | Last Updated: Jun 28 2018 3:44PM



मुंबई: पुढारी ऑनलाईन

घाटकोपरमध्ये चार्टर्ट विमान कोसळून झालेल्या अपघातात महिला वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ज्या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर हे विमान कोसळले तेथे दुपारी 1 ते 2 दरम्यान जेवणाची सुट्टी होती. कामगारांच्या अनुपस्थितीमुळे मोठा अनर्थ टळला आणि हजारोंचे प्राण वाचवले.

वाचा: घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळले, वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू

महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटनेनंतर मोठा अनर्थ टळला. विमानात बिघाड असल्याचे लक्षात आल्यानंतर मारिया यांनी घाटकोपरमधील मोकळ्या जागेत विमानाचे क्रॅश लँडिंग केले. विमानाच्या महिला पायलट मरिया यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. विमानाच्या पायलट मारिया यांनी प्रसंगावधान दाखवले नसते, तर परिस्थिती आणखी भयानक झाली असती. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळील परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. विमान दुर्घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर मोकळा आहे. त्यामुळे मारिया यांनी शेवटपर्यंत विमान मोकळ्या जागी उतरवण्यासाठी प्रयत्न केला आणि विमान रहिवासी ठिकाणी कोसळणार नाही याची दक्षता घेतली. विमान एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये अपघातग्रस्त झाले. विमान अपघातग्रस्त झालेल्या शेजारी मोठा रहिवासी आणि वर्दळीचा परिसर आहे. याशिवाय जवळच एक कॉलेज आहे. विमान रहिवासी परिसरात कोसळले असते. तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे महिला पायलटने आपले कौशल्य आणि प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना टाळली आहे. स्थानिक नागरिक या महिला पायलटच्या शौर्याला सलाम केला असून त्याच्या कुशलतेचे कौतुक करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घटनास्‍थळी पाहणी 

ही घटना रहीवाशी ठिकाणाच्या जवळ घडली, मात्र महिला वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे या अपघाताची तीव्रता काहीशी कमी झाली. दरम्‍यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमान दुर्घटनाग्रस्‍त झालेल्‍या ठिकानाला भेट दिली. या ठिकाणाची पाहणी करून त्‍यांनी परिस्‍थितीचा आढावा घेतला.