होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणच्या पत्रीपुलावर चालती कार पेटली 

कल्याणच्या पत्रीपुलावर चालती कार पेटली 

Published On: Aug 22 2018 11:09PM | Last Updated: Aug 22 2018 11:09PMडोंबिवली : वार्ताहर

एकीकडे कल्याणचा जूना पत्रीपुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. मात्र त्याच्याच बाजूला असलेल्या नव्या पुलावर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच या आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली होती. कारला आग लागली. त्यावेळी कारमध्ये प्रवासी होते. मात्र ते वेळीच कारबाहेर पडल्याने बालबाल बचावले.

ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक घडल्याने रस्त्यावरील लोकांची पळापळ झाली. सदर मारूती कारच्या इंजिनातून अचानक धूर येऊ लागला. त्याचवेळी आतील चालकाने कार थांबवून बाहेर पळ काढला. पेट घेतलेल्या कारचे या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वेळाने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र संपूर्ण कार जळून खाक झाली होती. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग विझवून कार बाजूला घेईपर्यंत खूप वेळ लागल्याने सदर पुलाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर काही वेळाने या मार्गावर पुन्हा वाहतूक सुरु केली.