होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रयोग नाहीत; फक्त संमेलन, संमेलन अन् संमेलनच

प्रयोग नाहीत; फक्त संमेलन, संमेलन अन् संमेलनच

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:44AMमुंबई : संजय कुळकर्णी 

98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनास बुधवारी दुपारी  4.30 वाजता नाट्य दिंडीने प्रारंभ होणार असून संमेलनासाठी मुलुंड परिसर बॅनर, होर्डिंग्ज आणि झेंड्यांनी सजला आहे. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काय बोलणार आहेत याकडे रंगकर्मीयांचे लक्ष लागलेले आहे. तसेच शरद पवार आणि राज ठाकरे हे प्रमुख पाहुणे असल्यामुळे त्यांच्या तिरकस भाषणाचेसुद्धा आकर्षण आहे. सुधा करमरकर, डॉ. हेमू अधिकारी आणि किशोरी आमोणकर हे तीन रंगमंच कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहेत. 

नाट्य संमेलनाच्या  पूर्वापार प्रथेप्रमाणे नाट्य दिंडी मुलुंड पश्‍चिम येथून निघून ती महाकवी कालिदास नाट्य नगरीत येईल. नाट्य  संमेलनाचे उद्घाटन ज्येेष्ठ लेखक - दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार असल्यामुळे समांतर रंगभूमीवरचे रंगकर्मी यंदाच्या नाट्य संमेलनात हिरिरीने सहभागी झाल्याचे दिसणार आहे. 

यंदा तरुण रंगकर्मी या संमेलनात जास्त हजेरी लावतील असे आयोजकांना वाटत आहे. काही तरुण रंगकर्मीयांशी संपर्क साधला असता जागरणाची तमा न बाळगता आपण हे संमेलन पाहणार असल्याचे सांगितले. प्रथमच खुल्या अधिवेशनातील ठरावांना चाट देण्यात आली असून जुन्या मंडळींत मात्र त्याबद्दल नाराजीचे सूर उमटलेले दिसतात. ते ठराव खुल्या अधिवेशनात मांडले जातात, पण संमेलन  संपल्यावर मात्र ते विरून जातात आणि त्यावर कसलीही अंमलबजावणी होत नाही असे कार्यकारी मंडळाचे मत पडले आहे.असे ठराव काही विशिष्टच नाट्य परिषदेचे सभासद देत असत, त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.   नाट्यसंमेलनाच्या दिवशी निर्मात्यांनी नाटकांचे प्रयोग ठेवू नये अशी प्रथा होती. पण काही निर्मात्यांनी त्याकडे डोळेझाक करून पूर्वी प्रयोग केले, पण यंदा 13 ते 15 जून या 3 दिवसात नाट्यप्रयोग होणार नाहीत असे व्यवस्थापक संघाने घोषित केले आहे. याचाच अर्थ असा की यंदाचे नाट्यसंमेलन हे विशिष्ट्यपूर्ण आहे याची  ग्वाही तेथूनच मिळालेली आहे.