Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विदर्भातच होणार 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

विदर्भातच होणार 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:21AMठाणे : प्रतिनिधी 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या  वतीने आयोजित करण्यात येणारे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भातच होणार हे निश्‍चित झाले आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी  राज्यातील व राज्याबाहेरील 9 संस्थांनी इच्छा व्यक्त केली होती, मात्र 7 संस्थांनी या ना त्या कारणाने संमेलनाच्या आयोजनात असमर्थतता व्यक्त केली. महामंडळाकडे आलेल्या संमेलनाच्या प्रस्तावात वर्धा आणि यवतमाळ येथील संस्थांनी टिकाव धरल्याने यंदा विदर्भातच मराठी साहित्य संमेलन होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले  आहे. 

91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे झाले. या संमेलनाच्या समारोपाच्या वेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुस्तकांच्या गावी म्हणजे भिलार येथे शासनाच्या वतीने घेण्याची घोषणा केली होती. मात्र सांस्कृतिक मंत्र्यांच्या या घोषणेला महाराष्ट्र साहित्य परिषदेने हरकत घेतल्याने संमेलन आयोजनाचा चेंडू पुन्हा महामंडळाच्या कोर्टात आला. त्यानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजन करण्याची तयारी महाराष्ट्रातील 8 तर मध्य प्रदेशातील 1 संस्थेने दर्शविली होती. 

92 व्या संमेलनासाठी महाराष्ट्र साहित्य - शाहुपुरी शाखा (सातारा), विदर्भ साहित्य संघ ( शाखा- अमरावती), विदर्भ साहित्य संघ (वाशीम शाखा), सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान (अंमळनेर), एज्युकेशन सोसायटी (नायगाव बाजार, नांदेड), कल्याण शिक्षण संस्था (नागपूर), महाराष्ट्र शिक्षण मंडळ (जबलपूर), विदर्भ साहित्य संघ, (वर्धा शाखा) आणि डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघ, यवतमाळ शाखा यांच्याकडून संमेलनासाठी निमंत्रणे आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिली. 

या 9 आमंत्रणांपैकी अंमळनेर येथील संस्थेने निमंत्रण दिले असले तरी संमेलन घेण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. सातारा व अमरावती येथील संस्थांनी यंदा संमेलनासाठी आमच्या निमंत्रणाचा विचार करू नये, असे महामंडळास कळविले आहे. नायगाव बाजार (नांदेड) येथील संमेलनाच्या निमंत्रणाचा विचार करू नये, अशी सूचना मराठवाडा साहित्य परिषदेने महामंडळाला केली आहे.