Fri, Jul 19, 2019 18:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कविता २० ओळींमध्येच सादर करा

कविता २० ओळींमध्येच सादर करा

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:55AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी 

बडोदा येथे 16 ते 18 फेब्रुवारी 2018 दरम्यान 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात होणार्‍या कवी कट्ट्यावर सादर होणार्‍या कवितेला 20 ओळींची मर्यादा आहे. कवींनी या कट्ट्यावर आपली कविता 20 ओळीतच सादर करावी, असे आवाहन कवी कट्टा संयोजन समितीने केले आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी मोठ्या संख्येने काव्यवाचनासाठी नवोदित आणि ज्येष्ठ कवी उत्सुक असतात. ज्येष्ठ आणि नामांकित कवींसाठी संमेलनात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले जाते. मात्र नवकवींना संधी देण्यासाठी, व्यासपीठ देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून संमेलनात कवी कट्ट्यांचे आयोजन केले जात आहे. संमेलनाच्या तीनही दिवस कवी कट्टयावर कविता ओसंडून वहात असते, त्यामुळे निमंत्रितांमध्ये सहभाग न मिळालेले आणि नवकवींची मदार या कवी कट्ट्यावर असते.  कवी कट्ट्यावर कविता सादरीकरणासाठी इच्छुक कवींची संख्या दिवसेदिंवस वाढतेच आहे, कवितेचे सादरीकरण करण्याची संधी न मिळालेले कवी आणि संयोजक यांच्यात वादाचे प्रसंगही यामुळे अनेकवेळा उद्भभवले आहेत. यासाठी जास्तीत जास्त कवींना कविता सादरीकरणाची संधी कट्ट्यावर मिळावी यासाठी कवी कट्ट्यावर 20 ओळींची कविता सादर करण्याची महत्त्वाची अट कवी कट्टा संयोजन समितीने केले आहे. 

या कट्ट्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, हैदराबाद या ठिकाणावरून कविता मागविण्यात आल्या आहेत.  कविता पाठविणार्‍या कवींनी स्वरचित कविता आणि एकच कविता पाठवावी, कविता ही 20 ओळींपेक्षा जास्त मोठी नसावी. कवितेचे सादरीकरण 3 मिनिटांत करावे, असे आवाहन समितेने केले आहे. या कट्ट्यासाठी कवींनी मराठी वाङमय परिषद, बडोदे, लक्ष्मी सदन,  पारकर वाडा, दांडिया बाजार, बडोदे, गुजरात. पिन कोड- 390001 या पत्त्यावर किंवा mvpbkavikatta@gmail.com या मेल आयडीवर कविता पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे.