Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समृद्धी मोबदल्यासाठी ९० वर्षीय आजींचा उपोषणाचा इशारा 

समृद्धी मोबदल्यासाठी ९० वर्षीय आजींचा उपोषणाचा इशारा 

Published On: Feb 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 01 2018 1:05AMडोळखांब : दिनेश कांबळे 

मुंबई-नागपूर समृद्धी शीघ्रगती महामार्गबाधीत शहापूर तालुक्यातील खर्डीजवळील दळखण येथील 90 वर्षीय सावित्रीबाई कदम यांना भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास खरेदीखताने संमती देऊनही त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवल्याने या आजीबाईंनी शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी बाधीत शेतकर्‍यांविरोधी जाणीवपूर्वक लालफितीची भूमिका घेत असल्याचे व त्यातून सरकारी अधिकारीच समृद्धीच्या मार्गात खोडा घालत असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.

सावित्रीबाई बळीराम कदम यांच्या मालकी हक्काची सर्व्हे व गट क्रमांक 224 (ब) या वर्णनाच्या जमिनीचे 1 एकर 26 गुंठे क्षेत्र समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात बाधीत होत आहे. महामार्गाच्या भूसंपादनाला होत असलेल्या शेतकर्‍यांच्या बर्‍याच विरोधानंतरही सावित्रीबाई यांनी शनिवार, 13 जानेवारी 2018 रोजी भूसंपादनाला खरेदीखताने संमत्ती दिली. त्यावेळी या भूसंपादनाचा 2 कोटी 76 लाख रुपये रक्कमेचा मोबदला दुसर्‍याच दिवशी बँकेच्या खात्यात आरटीजीएस पद्धतीने जमा होईल असे त्यांना सांगण्यात आले होते. या भूसंपादनापूर्वी मुंबईतील खासगी विकासकाने घेतलेल्या हरकतीने त्यांना भिवंडी प्रांतअधिकार्‍यांच्या न्यायालयातही सामोरे जावे लागले होते. प्रांतअधिकार्‍यांचा लेखी निर्णय सावित्रीबाई यांच्या बाजुने मिळाला असताना व हे सर्व सोपस्कार पार पाडूनही समृद्धीच्या भूसंपादन अधिकार्‍यांनी मोबदल्यापासून वंचित ठेवल्याने सावित्रीबाईंच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांना न्यायासाठी साकडे घालून शहापूर तहसीलदारांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.