Fri, Mar 22, 2019 05:31
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नदी-नाल्यालगत ९० हजार झोपड्या होणार बाधित!

नदी-नाल्यालगत ९० हजार झोपड्या होणार बाधित!

Published On: Apr 29 2018 2:39AM | Last Updated: Apr 29 2018 2:32AMमुंबई : प्रतिनिधी 

नदी व नाल्यांना येणारे पूर लक्षात घेऊन पालिकेने विकास आराखडा 2034 मध्ये नदी, नाले व खाडी किनार्‍या लगतची जागा प्रतिबंधक पट्ट्ा म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे किनार्‍यालगत गेल्या काही वर्षात वसलेल्या सुमारे 90 हजाराहून जास्त झोपड्या बाधित होणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 

मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये प्रलयकारी पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. नदीकिनारी वसलेल्या कुर्ला, बांद्रा, सांताक्रूझ आदी भागातील झोपड्यांसह आजूबाजूच्या भागात पाणी शिरल्यामुळे करोडो रुपयांची वित्तहानी झाली होती. एवढेच नाही तर, अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते. त्यामुळे मुंबईतील मिठी नदीसह ओशिवरा, दहिसर, पोयसर या प्रमुख नद्यांसह मोठे नाले, खाडी किनार्‍या लगतची 100 ते 150 मिटर जागा प्रतिबंधक पट्टा म्हणून घोषित करण्याची मागणी नगरसेवकांसह सामाजिक संस्थांनी केली होती. त्यानुसार पालिकेने 2034 च्या विकास आराखड्यात नदी, नाले, खाडी लगतचे जागा प्रतिबंधक पट्टा म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पालिकेला नदी व नाल्यांच्या किनारी वसलेल्या झोपड्या हटवणे भाग पडणार आहे. 

मिठी नदीसह दहिसर, ओशिवरा, पोयसर या नद्यांसह मोठ्या नाल्यांच्या किनार्‍याला सुमारे 90 हजार झोपड्या वसल्या आहेत. यातील बहुतांश झोपड्या या 2000 पुर्वीच्या आहेत. त्यामुळे या झोपडीधारकांना पालिकेला पर्यायी घरे द्यावी लागणार आहेत. सध्या पालिकेकडे प्रकल्पग्रस्तांसाठी पर्यायी घरे देण्यासाठी माहूल हाच पर्याय आहे. पण येथे 90 हजार झोपड्यांचे पुनर्वसन करणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेला प्रकल्पग्रस्त झोपड्यांसाठी त्या-त्या विभागात घरे बांधावी लागणार आहेत. विकास आराखड्यात ना विकास क्षेत्र विकासाकरिता खुले होणार असल्यामुळे येथील काही जागेत प्रकल्पग्रस्तांना घरे बांधता येतील का ? याचा अभ्यास करावा लागणार असल्याचे पालिकेच्या पर्जन्यजलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.

Tags : Mumbai, mumbai news, 90 thousand hut, interrupted,