Sat, Mar 23, 2019 16:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ९ वर्षांच्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग

९ वर्षांच्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 12:52AMमुंबई : प्रतिनिधी

कुर्ला येथे राहणार्‍या एका नऊ वर्षांच्या मुलीचा तिच्याच खाजगी ट्युशनमध्ये 54 वर्षांच्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी विनयभंगासह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षकाला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सांगितले. 

ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजता कुर्ला येथील एका खाजगी ट्युशनमध्ये घडली. आरोपी शिक्षक हा त्याच्या राहत्या घरी खाजगी ट्युशन घेतो. याच ट्युशनमध्ये नऊ वर्षांची ही मुलगी येते. याच परिसरात ती तिच्या पालकांसोबत राहत असून तेथील एका खाजगी शाळेत शिकते. 

शनिवारी सकाळी दहा वाजता ती नेहमीप्रमाणे ट्युशनला गेली होती. यावेळी शिकवणी घेताना आरोपी शिक्षकाने तिच्याशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली होती. 

घरी आल्यानंतर तिने तिच्या पालकांना ही माहिती दिली. या माहितीनंतर सोमवारी तिचे पालक विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंग आणि पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच रात्री शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.