Fri, Sep 20, 2019 06:46



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या वाहतूक प्रणालीसाठी ८९१ कोटी

मुंबईच्या वाहतूक प्रणालीसाठी ८९१ कोटी

Published On: Aug 21 2019 1:51AM | Last Updated: Aug 21 2019 1:51AM




मुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईतील वाहतुकीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली प्रकल्प राबविण्यासाठी 891 कोटींचा खर्च करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई महानगराची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 30 लाख इतकी असून महानगराचे क्षेत्रफळ सुमारे 438 चौरस किलोमीटर आहे.  महानगरामध्ये सध्या सुमारे 34 लाख वाहने असून प्रतिहजार व्यक्तींमागे साधारणत: 261 व्यक्तींकडे स्वत:चे वाहन आहे. मुंबई महानगरातील वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा यातून प्रवासासाठी लागणारा वेळ व इंधनावर होणारा खर्च, प्रवासासाठी लागणार्‍या वेळेतून कार्यक्षमतेवर होणारा परिणाम या सर्वांवर उपाय म्हणून अद्ययावत वाहतूक व्यवस्थापनाची गरज आहे. 

रस्त्यांच्या लांबीनुसार वाहनांची संख्या निश्‍चित  करुन तसेच रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण विचारात घेऊन प्रत्यक्षपणे सिग्नल यंत्रणेच्या वेळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करणे आता शक्य होणार आहे. गरजेप्रमाणे सिग्नल यंत्रणेची वेळ बदलता येणार आहे. स्मार्ट सिग्नलिंग, लायसन्स नंबर प्लेट ओळख, अतिवेगवान अथवा चुकीच्या दिशेने येणारी वाहने आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, चोरीची वाहने शोधण्यास मदत, दंड वसुलीत वाढ हे फायदे या प्रकल्पातून साध्य होणार आहेत.

     मुंबई महानगरात सुमारे 2 हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. यातील सुमारे 95 टक्के रस्त्यांची देखभाल ही मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते. 
     मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने मुख्यत्वे उड्डाणपूल बांधण्यात येतात.
     या सर्व रस्ते, उड्डाणपूल यांच्यावरील एकत्रित वाहतूक नियंत्रण आणि नियोजनासाठी इंटिलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम हा प्रकल्प राबवला जाणार आहे. 



 





WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex