होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबाद : कचरा व्यवस्थापनासाठी ८६ कोटींचा आराखडा मंजूर : मुख्यमंत्री

कचरा व्यवस्थापनासाठी ८६ कोटींचा आराखडा मंजूर : मुख्यमंत्री

Published On: Mar 15 2018 7:59PM | Last Updated: Mar 15 2018 7:29PM



मुंबई : प्रतिनिधी

औरंगाबाद येथील कचरा व्यवस्थापनासाठी ८६ कोटींचा आराखडा मंजूर करून त्यासाठीचा सर्व निधी केंद्र व राज्य सरकार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी जागेचा वापर करावाच लागतो. मात्र, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा देण्याची कोणाचीच तयारी नसते याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद मधील कचरा प्रश्नावरून निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरून मोठा गदारोळ सुरु आहे. औरंगाबादमध्ये निर्माण झालेल्या कचराकोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चे संबंधित त्यांनी यासंबंधी उत्तर दिले. कचऱ्याचं अर्थकारण बंद करून कचऱ्यातून संपत्ती उभी करायची मानसिकता रुजायला हवी त्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनमत तयार करावं असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले .

गेल्या 10 वर्षात प्रचंड नागरीकरण झालं, मात्र त्यानुसार नियोजन झालं नाही त्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून संपूर्ण राज्यात 152 शहरांचे 1856 कोटी रुपयांचे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 31 मार्चपर्यंत अन्य 48 शहरांचे प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

औरंगाबाद शहराच्या 86 कोटी रुपयांच्या कचरा व्यवस्थापनाच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून यासाठीचा संपूर्ण निधी राज्य आणि केंद्र सरकार उपलब्ध करून देणार असून  36 कोटी रुपयांच्या महानगरपालिकेच्या हिश्श्याचे पैसे राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेला यासाठी कोणताही निधी द्यावा लागणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.