Thu, Jul 18, 2019 15:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाशीत ८५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

वाशीत ८५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 12:55AMनवी मुंबई: प्रतिनिधी 

मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईत गेल्या वर्षाभरात दाखल झालेल्या जुन्या नोटांच्या प्रकरणात सुमारे तीन कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. मात्र हे सत्र थांबण्याचे काही नाव घेत नाही. शुक्रवारीही नवी मुंबई पोलिसांनी जुन्या नोटा बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहा जणांकडून 85 लाख रुपये हस्तगत केले.  हे प्रकरण अदखलपात्र गुन्हा या सदरात येते. त्यामुळे न्यायालयाची परवानगी घेऊन कलम 155 नुसार त्या दहाजणांची चौकशी केली जाणार असल्याचे डीसीपी तुषार दोषी यांनी स्पष्ट केले. 

जुन्या नोटा बंद होऊन वर्ष होत आले. तरीही अजून जुन्या नोटा बाजारात असल्याचे पोलिसांच्या या कारवाईवरून उघडकीस आले आहे. शुक्रवारी तब्बल 85 लाखांच्या जुना नोटा वाशीतील 7 जणांकडे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इतक्या मोठ्या प्रमाणात जुना नोटा ते कोणाला द्यायला आले होते,त्यांनी ते कुठून आणल्या याबाबत पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात संबधित व्यक्तीबाबत चौकशी करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. परवानगी मिळाल्यानंतर कलम 155 नुसार त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यांना प्राथमिक चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोषी यांनी दिली. 

शाफिक खान ( घाटकोपर),  चेतन पाटील (भांडूप),  हबीब शेख ( विक्रोळी),  व्ही थेवर (धारावी),  मोहन रौधल ( मालाड),  तुषार दत्ताराम मोकल ( कामोठे),  देविदार भवर ( चेंबूर), अनिता सांगळे, शशिकांत सांगळे आणि सुप्रिया आंबरेकर (मालाड) अशा 10 जणांकडे या जुन्या नोटा मिळाल्या. 

वाशी ओव्हरब्रीजच्या खाली 1 हजार रुपये किंमतीच्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात घेऊन येणार असल्याचे माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशी प्लाझा बस स्टॉपजवळ सापला लावला. त्यावेळी एक इसम त्याच्या ताब्यातील दोन पिशव्या घेऊन एमएच 43 ए आर 5532 स्वीप्ट डिझायर कारजवळ येऊन उभा राहिला.  त्यानंतर कारमध्ये असणार्‍या महिला व पुरुषांना त्याने इशारा केला असता पोलिसांनी सापळा लावून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.