Tue, Mar 26, 2019 07:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणेशोत्सवासाठी ८२० बसेस फुल्ल

गणेशोत्सवासाठी ८२० बसेस फुल्ल

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 12:48AMठाणे : प्रतिनिधी 

गणपतीसाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनी यंदाही एस. टी. ला पसंती दिली आहे. गणपतीसाठी कोकणच्या वाटेवर 820 बसेस 8 सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत. या 820 बसेसपोटी एस. टी महामंडळाच्या ठाणे विभागाला सुमारे 95 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

ठाणे विभागातून सुटणार्‍या बसेसपैकी 393 बसेसचे ग्रुप बुकिंग, तर 427 बसेसचे वैयक्तिक आरक्षण झाले आहे. कोकणच्या वाटेवर सर्वाधिक बसेस रत्नागिरी जिल्ह्यात धावणार आहेत. दरवर्षी चाकरमान्यांकडून ग्रुप बुकिंगला जास्त प्रतिसाद मिळतो, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रुप बुकिंगच्या 100 बसेस कमी बुक झाल्या आहेत, मात्र वैयक्तिकरीत्या आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
गणपतीसाठी जाणार्‍या भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यांना इच्छित स्थळी वेळेत पोहोचता यावे यासाठी कोकणात जाणार्‍या रस्त्यांवरील खड्डे  बुजविण्यात यावेत, यासाठी महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

जुनेच चालक

गेल्या दोन - तीन वर्षांत कोकणाच्या वाटेवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोकणाच्या वाटेवर गणेशोत्सवाच्या काळात होणार्‍या वाहतुकीसाठी कोकणाच्या रस्त्यांची माहिती असणार्‍या जुन्या चालकांनाच बसेस घेऊन पाठवण्यात येणार आहे. चालकांनी मद्यपान करून बस चालवू नये, याची पूर्ण  खबरदारी घेण्यात येणार आहे. यासाठी महामार्गावर तसेच प्रत्येक आगारात चालकांनी मद्यपान केले आहे का, याची चाचणी करण्यात येणार आहे. 

शिवशाही नाही

नव्याने सुरू झालेल्या शिवशाही बसच्या अपघातांचे प्रमाण साध्या एस. टी. च्या तुलनेत जास्त आहे, त्यामुळे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांकडूनच शिवशाहीची मागणी करण्यात आलेली नाही.