Thu, Jul 18, 2019 04:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इच्छामरण : वय झाले, जवळचे कुणीही नाही...!

इच्छामरण : वय झाले, जवळचे कुणीही नाही...!

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 20 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी 

गिरगावातील एका वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे, मात्र ही परवानगी त्यांना न मिळाल्याने निराश झालेल्या या दाम्पत्याने स्वत:च्या हत्येची योजना आखली आहे. नारायण लवाटे आणि इरावती लवाटे या दाम्पत्याने इच्छामरणाचा निर्णय घेतला आहे. जवळचे कुणी नसल्याने शरीराला त्रास देण्यापेक्षा मरण पत्करण्याची या दाम्पत्याची इच्छा आहे. मात्र आता राष्ट्रपतींनी दोन महिन्यानंतरही इच्छामरणावर निर्णय न घेतल्याने त्यांनी 31 मार्चनंतर आम्ही एकमेकांची हत्या करू असे म्हटले आहे.

दक्षिण मुंबईतील चर्नीरोडभागात ठाकूरद्वार येथे नारायण आणि इरावती लवाटे हे दाम्पत्य राहते. 78 वर्षीय इरावती लवाटे आणि 87 वर्षीय त्यांचे पती नारायण लवाटे हे गेल्या पन्नास वर्षांपासून विवाहानंतर एकत्र राहत आहेत. या दाम्पत्याला मूल नाही, तसेच कुठला गंभीर आजारही नाही. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नाही, असे या दाम्पत्याला वाटत आहे. नर्स अरुणा शानबाग यांना इच्छामरण मिळावे, यासाठी केईएम हॉस्पिटलने दया याचिका दाखल केली होती. ते वाचून या दाम्पत्याने इच्छामरणाचा विचार केला होता. नारायण लवाटे एसटीत सुपरवायजर होते, तर इरावती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. या दोघांनाही वाढत्या वयाप्रमाणे आपल्याला आजार जडून आपले हाल होतील, अशी भीती आहे. 

वाढत्या वयामुळे घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. सारखे घरात बसून रहावे लागते. जगात आपले म्हणणारे कुणी नाही. मेट्रोसाठी रस्ते एवढे खोदलेत की, कुणाच्या तरी हाताला धरल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही, असे इरावती म्हणाल्या.पूर्वी भ्रम्हचर्या आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्ताश्रम आणि संन्यासाश्रम या चार टप्प्यांमध्ये जीवन व्यथीत करत. संन्यासाश्रम या टप्प्यात संन्यास घेऊन जंगलामध्ये निघून जात. मात्र आता वने शिल्लकच नसल्याने हे शक्य आहे का ? असा सवाल इरावती यांनी उपस्थित केला. 

इच्छामरण मिळावे म्हणून आपण 21 डीसेंबर 2017 रोजी राष्ट्रपतींकडे अर्ज केला आहे, मात्र यावर अद्याप काहीही उत्तर आले नसल्याचे नारायण म्हणाले. हायकोर्टाला 90 दिवसांची मुदत दिली आहे. निर्णय झाला तर आमचा इच्छा मरणाचा कायदेशीर मार्ग मोकळा होईल. आमच्याकडे आता काही उद्दीष्ट उरले नाही, आम्हाला कुठलीच किंमत राहिलेली नाही, मरण येत नाही म्हणून जगतोय. सध्या स्वतःच्या पायावर तरी जगतोय मात्र नंतर असाध्य आजार झाला तर काय होईल. आम्ही देहदानही केले आहे,  असेही ते म्हणाले. 

लग्नाच्या पहिल्याच वर्षी लवाटे दाम्पत्यानी मूल जन्माला घालायचे नाही, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना कुणीही वारस नाही. अनेक वर्षे सोबत सुखाने जगलो, आता आम्हाला सोबत मृत्यू मिळावा म्हणून आम्ही इच्छामरणाची मागणी केली आहे, असे या दोघांनी म्हटले. इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून हे दाम्पत्य 30 वर्षे पाठपुरावा करत आहे. आता दोघेही दाम्पत्य गिरगावातील ठाकूरद्वार भागात असलेल्या चाळीत राहतात. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ दिली, आता मृत्यूदेखील सोबत यावा, अशी इच्छा या दोघांनीही व्यक्त केली आहे.