Tue, Mar 26, 2019 07:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या किनाऱ्यावर ओखीने फेकला ८० टन कचरा

मुंबईच्या किनाऱ्यावर ओखीने फेकला ८० टन कचरा

Published On: Dec 07 2017 6:49PM | Last Updated: Dec 07 2017 6:49PM

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

चालू विकेंडला मुंबईतील एखाद्या बीचवर जाण्याचे नियोजन असेल तर ते रद्द करा. कारण नुकत्याच झालेल्या ओखी या वादळाने शहराची हवा शुध्द केली असली तरी समुद्र किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात सागरी कचरा आणून फेकला आहे. मुंबई महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळ या कालावधीत वादळामुळे समुद्रातील सुमारे ८० हजार किलो किंवा ८० टन कचरा शहराच्या किनारपट्टीवर फेकला गेला आहे.

वादळामुळे मोठमोठ्या लाटा किनार्‍याला येवून धडकल्यामुळे समुद्राच्या मध्यावर तरंगत असलेला कचरा किनारपट्टीवर फेकला गेला आहे. सर्व प्रभाग अधिकार्‍यांना किनारे स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आल्याचे घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले. आतापर्यंत विविध किनार्‍यांवरुन २६ ट्रक कचरा गोळा करण्यात आला असून आगामी तीन ते चार दिवस हे काम सुरु राहणार असल्याचेही त्याने सांगितले.

सागरी कचर्‍याचा वार्सोव्हा व जुहू या बीचना मोठा फटका बसला असून दादर चौपाटी, मरिन ड्राईव्ह, नरिमन पाईंट तसेच मार्वे या बीचवरही मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. वार्सोव्हा व जुहू या बीचवर एकूण २५ हजार किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. यापैकी वार्सोव्हा येथील १५ हजार किलो तर जुहू येथील १० हजार किलो कचर्‍याचा समावेश आहे, अशी माहिती सहाय्यक महापालिका आयुक्त प्रशांत देशमुख यांनी दिली. 

वार्सोव्हा बीचवर देवाचीवाडीजवळ दोन फूट उंचीपर्यंत कचरा साचला होता. सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांची आवरणे, कपडे, चपला यांच्यासह इतर वस्तूंचा खच पडल्याने बुधवारी सकाळी बीचवर चालणेही कठीण होऊन बसले होते, अशी माहिती शहरातील वकील अफ्रोज शाह यांनी दिली.