Mon, Jul 22, 2019 00:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भर मिरवणुकीत बाप्पाच्या साक्षीने ८० मोबाईल चोरीला

मिरवणुकीत बाप्पाच्या साक्षीने ८० मोबाईल चोरीला

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 2:13AMमुंबई : प्रतिनिधी

बाप्पाच्या आगमन मिरवणूक सोहळ्यास सुरूवात झाल्यानंतर मुंबईकरांनी केलेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सुमारे 80 मोबाईल लंपास केले. काळाचौकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारी नोंदविल्या आहेत. शिवाय मिरवणूकीत काही अतिउत्साही तरूणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. गर्दीवर नियंत्रण मिळवंयासाठी त्यांना आपल्या काठीचा धाक दाखवावा लागल्या.

गिरणगावातील अनेक मंडळांच्या गणपतींचा आगमन सोहळा शनिवारी पार पडला. मात्र बाप्पाची आगमन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह, ठाणे, नवी मुंबई, कल्याण येथून भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणेशोत्सवात पोलिसांकडून वारंवार गर्दी कमी करा, मौल्यवान वस्तू बाळगू नका अशा सुचना देण्यात येत होत्या. मात्र अतिउत्साही भाविकांनी सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे चोरांनी मोबाईलवर डल्ला मारला. यातील सर्वाधिक मोबाईलच्या चोर्‍या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात झाल्या असल्याचे मोबाईल चोरीला गेलेल्या तक्रारदार अमन गुप्तायांनी सांगितले.

गणेशभक्तांच्या खिशावर डल्ला मारून चोरांनी मोबाईल लंपास केले. मोबाईल चोरीनंतर काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठीही गणेश भक्तांच्या रांगा लागल्या. गेल्या काही वर्षापासून चिंतामणीच्या आगमन सोहळा पाहणार्‍या गणेशभक्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शनिवारीच्या आगमन सोहळ्यात भक्तगणांना उभे राहण्यासाठी बीए रोडवरी जागा मिळाली नाही. शेवटी लालबाग पुलाखाली पालिकेने नुकत्याच बसवलेल्या जाळ्या तर तोडल्याच शिवाय पुलाखाली केलेल्या सजावटीसाठीच्या झाडांची नासधूस केली. बेभान झालेले कार्यकर्ते चालत्या बेस्ट बस आणि ट्रकवर नाचत होते. पोलीस अशा अतीउत्साही तरुणांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दिलेल्या सुचनांचे पालन कोणीही करीत नव्हते. तरिही काळाचौकी पोलीसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

अनेक मंडळांच्या बाप्पाच्या आगमन मिरवणूक सोहळ्यास सुरूवात झाल्यानंतर प्रचंड मोठी गर्दीचा फायदा घेत अतीउत्साही तरुणांची हुल्लडबाजी सुरूच होती. बेस्टबसच्या टपावर नाचून बसचे नुकसान करण्याचाही काहींनी प्रयत्न केला. काहींनी तर काही टॅक्सींच्या काचा फोडण्याचाही प्रयत्न केला. 

या आगमन सोहळ्यामुळे संपूर्ण बी. ए. मार्ग, गं. द. आंबेकर मार्गावर वाहतूक कोंडी समस्या जाणवत होती. वाहतूक पोलिसांकडून वाहनांची गर्दी कमी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आगमन मिरवणूकांमुळे मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. 

वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेलाही वाट मिळत नव्हती. द्रोण कॅमेरा वापरण्याची परवानगी नसतानाही चिंतामणीचे रुप कॅमेर्‍यात टिपण्यासाठी गणेशभक्त द्रोण कॅमेर्‍याचा सर्रास वापर करत होते. काळाचौकी पोलीसांकडून अशा नियम मोडणार्‍यांना 3 भक्तांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.