Mon, Aug 19, 2019 13:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 8 हजार कोटींचा एमयूटीपी-2 अपयशी

8 हजार कोटींचा एमयूटीपी-2 अपयशी

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:33AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीवर एमयूटीपी - 2 (मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट)हा 5400 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्याचा मुख्य उद्देश मुंबई उपनगरीय  रेल्वेवरचा प्रवाशांचा भार कमी करून त्यांचा प्रवास सुसह्य व सुकर करणे हा होता.  मात्र, हा प्रकल्प सुरू होऊन सहा वर्षे झाली  व  त्याची किंमत 8087 कोटींवर  पोहोचूनही तो पूर्ण करण्यात अपयश आल्याबद्दल जागतिक बँकेने आपल्या अहवालात कोरडे ओढले आहेत. रेंगाळलेला हा प्रकल्प आता 2022 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे.

हा प्रकल्प सुरू करताना  लोकलमधील गर्दी कमी करणे, गाड्यांचे वेळापत्रक काटेकोर ठेवणे, अन ठरलेल्या वेळेत गाड्या इप्सित स्थळी पोहोचणे आदी बाबींवर भर देण्यात आला होता. मुंबई उपनगरीय लोकलमधून दररोज साधारणतः 75 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सुधारणा करण्यासाठी एमयूटीपी - 2 या प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. त्याला जागतिक बँकेनेही आर्थिक मदत केली. या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यानुसार लोकलमधील वारेमाप गर्दी कमी करून ती 4000 प्रवाशांवर आणणे, विविध टप्प्यांवर प्रवासाच्या वेळेत 2 ते 6 मिनिटांची कपात करणे, पश्‍चिम रेल्वेवरील किमान 98.5 टक्के गाड्या व मध्य रेल्वेवरील 94 टक्के गाड्या निश्‍चित वेळेत धावणे यासारखे टार्गेट ठेवण्यात आले होते. परंतु, जागतिक बँकेच्या अहवालानुसार सोपे असणारे हे टार्गेटही रेल्वेला पूर्ण करता आलेले नाही.  

सुरुवातीला हा प्रकल्प 5400 कोटींचा होता, पण नंतर त्याचे बजेट 8087 कोटीपर्यंत वाढल्याकडेही बँकेने लक्ष वेधले आहे. एमयूटीपी - 2 या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर 2010 मध्ये सुरू झाले. मात्र, त्याच्यासमोर ठेवण्यात आलेले टार्गेट हे एप्रिल 2009 मध्ये निश्‍चित करण्यात आले होते. तसेच, मूळ आराखड्यानुसार हा प्रकल्प 2015 मध्ये पूर्ण होणार होता.  मात्र, डिसेंबर 2016 मध्येही हा प्रकल्प पूर्ण न होता त्याचा काही भाग पूर्ण झाला होता, यावर जागतिक बँकेने बोट ठेवले आहे. आता हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. 

या प्रकल्पासाठी जागतिक बँकेने 280 दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत केली होती.  मात्र, बँकेने मदत केलेल्या टप्प्याचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जागतिक बँकेचा अहवाल दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाला असून त्याच्या प्रती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन(एमआरव्हीसी), राज्य सरकार व भारतीय रेल्वेने स्थापन केलेली संयुक्त कंपनी, एमयूटीपी-2 च्या कार्यकारी मंडळांबरोबरच रेल्वेच्या अन्य प्रोजेक्टकडे सुपूर्द करण्यात आला आहे.