Mon, Jul 22, 2019 04:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पोलिसांना ८ तास ड्युटी!

मुंबई पोलिसांना ८ तास ड्युटी!

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 1:56AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

154 वर्षांच्या इतिहासात मुंबई पोलीस प्रथमच फक्‍त 8 तास काम करताना दिसणार आहेत. बुधवारपासून मुंबई महानगरातील सर्व पोलीस ठाण्यांत आठ तासांचे वेळापत्रक लागू करण्यात आल्याची आनंदवार्ता पोलीस आयुक्‍त दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी जाहीर केली. 

पोलिसांच्या 8 तास ड्युटीचा पहिला प्रयोग गतवर्षी देवनार पोलीस ठाण्यात झाला. त्यानंतर शहर उपनगरांमध्येही टप्प्याटप्प्याने तो अमलात आणला गेला. हा प्रयोग यशस्वी होताच हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पातळीपर्यंत 8 तासांचे वेळापत्रक आणण्यात आले. नंतर ते अधिकारी पातळीपर्यंतही लागू केले जाईल, असे पडसलगीकर म्हणाले. 

पोलीस उपायुक्‍त दीपक देवराज यांनी या नव्या वेळापत्रकाचा तपशील पत्रकारांना विस्ताराने दिला. शहरातील 94 पोलीस ठाण्यांपैकी तब्बल 75 टक्के पोलीस ठाण्यांना 8 तासांचे वेळापत्रक लागू करण्यात आले असून, सर्व वाहतूक शाखा आणि पोलीस दलाची अन्य खातीही या वेळापत्रकात आणण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यातील एकूण मनुष्यबळ आणि तेथील लोकसंख्या यांचा अंदाज घेऊन महिनाभरात 100 टक्के पोलीस ठाण्यांना 8 तासांचे वेळापत्रक लागू होईल, असा विश्‍वास देवराज यांनी व्यक्‍त केला. 

सततचा बंदोबस्त, त्यातून निर्माण होणारा ताण, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांमुळे अनेक पोलिसांचा कर्तव्यावर असतानाच मृत्यू झाला. हे प्रकार अलीकडे अधिक वाढले. मुंबई पोलीस सलग 16 तास बंदोबस्तावर राहणार्‍याची उदाहरणेही कमी नाहीत. अनेकदा सलग 72 तास सेवा बजावल्याचा विक्रमही मुंबई पोलिसांनी केला. मात्र त्याची मोठी किंमत आरोग्याच्या व कुटुंबाच्या पातळीवर मोजावी लागली. याचा विचार करूनच ‘मिशन 8 तास’ हाती घेतले. मुंबई पोलीस आता आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ देऊ शकतील, असा विश्‍वास पडसलगीकर आणि देवराज यांनी व्यक्‍त केला.

सीपींची भूमिका वडिलांसारखी!

मुंबई : प्रतिनिधी

आम्ही रोज 12 ते 14 तास ड्युट्या करत होतो. मात्र अन्य अस्थापनांमध्ये योग्या नियोजन करुन आठ तास ड्युट्या होत्या. पोलीस दलातील कामकाजाचे योग्य नियोजन केल्यास आठ तास ड्युट्या करणे सहज शक्य असल्याचा विचार मनात आला. मी कार्यरत असलेल्या देवनार पोलीस ठाण्यातील कामकाजाचा अभ्यास करुन एक उपक्रम तयार करुन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांना सादर केला. त्यांनाही या उपक्रमाला होकार दर्शवत, स्वत हा उपक्रमाच्या यशश्‍वी होण्यासाठी ते पुढे सरसावले.

वडिलांप्रमाणे त्यांनी ही भुमिका बजावत एका पाठोपाठ एक अशा सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपक्रम राबविण्यासाठी मोठी मेहनत घेतली. आठ तास ड्युट्यांचे खरे श्रेय पडसळगीकर यांनाच जाते असे गौरवोद्गार देवनार पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या रवी पाटील यांनी दै. पुढारीशी बोलताना काढले.

पोलीस ठाण्यांतील पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत अ, ब, क आणि ड गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली असून अधिकार्‍यांच्या आठ तास ड्युटीसाठी पोलीस ठाण्यांची ओ 1 आणि ओ 2 अशी वर्गवारी करण्यात आली आहे. दर तीन महिन्यांनी या उपक्रमाचा अभ्यास करुन यात आवश्यक ते बदल केले जात आहेत. येत्याकाळामध्ये यात आणखी सुसुत्रता आणि आधुनिकता आणण्याचे प्रयत्न आयुक्त पडसळगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे पाटील पुढे म्हणाले.

1 लाखांवर पोलीस भरती केली तरच राज्यभर 8 तासांची ड्युटी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

फक्‍त मुंबई पोलिसांना 8 तास ड्युटी. मग महाराष्ट्रातील पोलिसांचे काय? असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. राज्यभर 8 तास ड्युटीचे वेळापत्रक लागू करायचे असेल तर आणखी 50 टक्के पोलीस भरती करावी लागेल. म्हणजे अंदाज 1 लाख हून अधिक पोलीस भरती केले तरच ते शक्य आहे. 

राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस दलात आज घडीला 2 लाख 22 हजार 35 पदे आहेत. त्यापैकी 2 लाख 10  हजार पदे भरलेली आहेत. राज्यभर 8 तासांचे वेळापत्रक लागू करायचे असेल तर 1 लाख 11 हजार आणखी पदे निर्माण करावी लागतील. 

मुंबईचे पोलीस आयुक्‍त दत्ता पडसलगीकर यांनी देवणार पोलीस ठाण्यापासून 8 तास ड्युटीचा प्रयोग सुरू केला. हळूहळू 43 पोलीस ठाण्यांमध्ये नवे वेळापत्रक लागू झाले. आजघडीला पोलीस खात्यात मनुष्यबळाची प्रचंड टंचाई आहे आणि त्यामुळेच 8 तासांचे वेळापत्रक राज्यभर लागू करणे कठीण आहे, याकडे माथूर यांनी लक्ष वेधले.