Mon, Apr 22, 2019 21:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांना आता आठ तास काम

पोलिसांना आता आठ तास काम

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 2:07AM

बुकमार्क करा

मुंबई ः प्रतिनिधी

येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये पोलिसांना आठ तासांची पाळी सुरू करण्यात येणार आहे. देवनार पोलिस ठाण्यात दीड वर्षापूर्वी हा प्रयोग राबवल्यानंतर शहरातील 49 पोलिस ठाण्यांचा कारभार तीन पाळ्यांमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आला. त्यात आणखी 15 पोलिस ठाण्यांची भर पडली. या उपक्रमामुळे पोलिस कार्यतत्पर झालेच, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल दिसत आहेत.

पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकाराने 5 मे 2016 रोजी देवनार पोलिस ठाण्यात या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. नेहमीच्या कामकाजासोबत महापालिका निवडणूक, बकरी ईदसह मोठे सण, महापुरुषांची जयंती या धावपळीच्या काळातही देवनार पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळाचे अचूक नियोजन करून आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये यशस्वी काम करून दाखवले. त्यानंतर हा प्रयोग शहरातील अन्य पोलिस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात आला. वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढाव्यात प्रयोग यशस्वी ठरल्याने शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये तो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या 64 पोलिस ठाण्यांचे काम तीन पाळ्यांमध्ये सुरू आहे. उर्वरित 30 पोलिस ठाण्यांमध्ये ही कार्यपद्धती लवकर सुरू करून प्रजासत्ताक दिनाआधी शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांचे काम तीन पाळ्यांमध्ये चालवण्याचा पोलिस आयुक्तांचा मानस आहे.

तूर्तास ही कार्यपद्धती पोलिस ठाण्यांमध्ये नेमणूक असलेल्या पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक या कर्मचार्‍यांपुरतीच मर्यादित आहे. भविष्यात लिस मुख्यालय, सशस्त्र विभागासह अन्य  शाखांमध्येही ही कार्यपद्धती सुरू करता येईल का, यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीमुळे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन केल्याने पोलिस ठाण्यांची कार्यतत्परता उंचावली आहे. गस्तीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात चार वायरसेल व्हॅन आहेत. पूर्वी 12 तासांच्या दोन पाळ्यांमध्ये ही व्हॅन सरासरी 240 किलोमीटर कापून गस्त घालत असे. आता तीन पाळ्यांमध्ये ही वाहने एकूण 360 किलोमीटर फिरून गस्त घालतात. तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात. पोलिसांच्या मुख्य कक्षांना जास्त मनुष्यबळ मिळू लागले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांसोबत, गुन्हा नोंदवणे, गार्‍हाणी ऐकणे, गुन्ह्याची उकल, बंदोबस्त, गस्तयासाठी जास्त मनुष्यबळ मिळू लागले आहे.

पोलिसांमध्ये आनंद!

यापूर्वी बारा तासांच्या दोन पाळ्यांमध्ये पोलिस काम करत. गंभीर गुन्हा घडला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवला, निवडणूक, सण-उत्सवांमध्ये पोलिस 16 ते 18 तास अडकून पडत असत. आता ही वेळ आठ तास म्हणजेच निम्मी झाल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे  .