Tue, Jul 16, 2019 21:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पॉलिटेक्निक’च्या ७२ हजार जागा रिक्‍त

‘पॉलिटेक्निक’च्या ७२ हजार जागा रिक्‍त

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पाठोपाठ दहावीनंतर प्रवेेश होणार्‍या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागाही यंदा मोठ्या प्रमाणात रिक्‍त राहिल्या आहेत. गतवर्षी प्रमाणे यंदाही तब्बल 71 हजार 900 रिक्‍त राहिल्या आहेत. विशेष म्हणजे रिक्‍त राहिलेल्या जागांमध्ये पाच हजार जागा या शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयातील आहेत.

खाजगीप्रमाणे आता अनुदानित आणि शासकीय महाविद्यालयांतील जागा रिक्‍त राहत असल्याने पॉलिटेक्निकला बुरे दिन आले आहेत. गेल्यावर्षी तब्बल 80 हजार 835जागा रिक्‍त राहिल्या होत्या. त्याची टक्केवारी 56.64 एवढी होती. विशेष म्हणजे यावर्षी जागा रिक्‍त राहणार्‍या संस्थांतील 19 हजार जागा यंदा कमी केल्या होत्या. तरीही यंदा प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. 1 लाख 23 हजार 509 विद्यार्थ्यांपैकी केवळ 51 हजार 690 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर गेल्यावर्षी 61 हजार 884 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शासकीय महाविद्याल तसेच अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांतील पाच हजारहून अधिक जागा ओस पडल्या आहेत. विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसारच फी भरावे लागते असे असूनही या जागा भरलेल्या नाहीत. शासकीय महाविद्यालयातील 4 हजार 772 तर शासकीय अनुदानित महाविद्यालयातील 410 जागा रिकामी राहिल्या आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे  पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीस 16 जूनपासून सुरुवात झाली होती. गेल्यावर्षी पेक्षा अर्जही कमी आले होते. जागा अधिक आणि विद्यार्थी कमी, अशी स्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थी दहावीनंतर आयटीआय, द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे असलेला ओढा आणि बारावीनंतर बी. एस्सी आयटी, बीएमस यासारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाची ओढ यामुळे या पदविका अभ्यासक्रमाला फटका बसत आहे. यंदा दहावीच्या वाढलेल्या निकालाचा परिणाम पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर फारसा झालेला नाही. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांनाच उद्योग क्षेत्रातून मागणी रोडावली आहे. शासकीय महाविद्यालयाबरोबरच अनुदानित महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर रिक्‍त असणार्‍या शिक्षकांच्या जागा आणि सुमार दर्जाचे मिळणारे शिक्षण त्यामुळे महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना फारशी मागणी नाही. संस्थाचालकांकडून घेण्यात येणारी वारेमाप फी आणि त्यातून मिळणारे शिक्षण यामुळेही या अभ्यासक्रमाचे महत्त्व कमी झाल्याने या अभ्यासक्रमांच्या रिक्‍त जागांचे प्रमाण जास्त असल्याची टिका आता तंत्रशिक्षणावर होत आहे.