Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७ बायकांचा ‘पोलीस दादला’ निलंबित

७ बायकांचा ‘पोलीस दादला’ निलंबित

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:44AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

कौटुंबिक कलहही अनेकदा डोकेदुखी ठरुन अनेकांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवावे लागते. कुटुंबातील वाद किंवा पती-पत्नीतील कलह सोडवण्यासाठी पोलीस खात्याने स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत. मात्र याच खात्यातील एका हवालदाराने सामाजिक नियम धाब्यावर बसवून चक्क सातजणींना उल्लू बनवल्याचा धक्कादायक प्रकार त्याच्या एका वैतागलेल्या पत्नीमुळे उघडकीस आला आहे. सात बायकांच्या आयुष्याशी खेळणार्‍या या पोलिसाला अखेर निलंबित करण्यात आलेआहे.

डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत सूर्यकांत कदम याने चक्क सात महिलांशी विवाह केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. दुसरी पत्नी प्रचिता कदम हिने आपल्या पतीचा प्रताप उघडीस आणला आहे. प्रचिताने या प्रकरणी पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडेच तक्रार केल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्तांनी कदम याला सोमवारी निलंबित केले. 

अंबरनाथ येथील एका दवाखान्यात नर्सचे काम करणारी प्रचिता हिने कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांचे तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे. पती सूर्यकांत याने आपली फसवणूक केली आहे. प्रचिता ही कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील बालाजी पॅराडाईज सोसायटीत राहते. सूर्यकांतशी 1992 साली तिचा विवाह झाला. प्रचिता प्रमाणेच नोकरी करणार्‍या अन्य महिलांशीही त्याने लग्न केले आहे. एक-दोन महिलांशी नव्हे तर तब्बल सात महिलांचा तो दादला असल्याची बाब प्रचिताने तक्रारीद्वारे उघडकीस आणली आहे.  

पोलीस उपायुक्त डॉ. शिंदे यांनी कदमच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली असली तरी सात महिलांच्या आयुष्याशी खेळणार्‍या कदमच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार की नाही? याकडे प्रचितासह फसवणूक झालेल्या त्याच्या अन्य बायकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी कदमविरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र त्याच्याविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.