Sat, Jul 11, 2020 09:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दीड तासात ७ रुग्णांचा मृत्यू

ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दीड तासात ७ रुग्णांचा मृत्यू

Last Updated: Jun 02 2020 1:29AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

जोगेश्वरी येथील पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये शनिवारी मध्यरात्री तांत्रिक बिघाडामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे दीड तासात तब्बल सात रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे धक्‍कादायक वृत्त आहे.

हा भयंकर प्रकार घडला तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकही तज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे या प्रकरणाची  तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईत कोरोनाने आतापर्यंत सुमारे 1300 जणांचा बळी घेतला. यातील काही जणांचा मृत्यू अतिदक्षता विभागात दाखल झाल्यानंतर झाला आहे. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरना कमी दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्यामुळे हे मृत्यू होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जोगेश्वरी ट्रॉमा सेंटरमधील रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या निदर्शनास आणून दिले. 

वेळेत बेड व रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे दिवसभर कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार मिळत नाहीत. अनेकदा स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी रुग्णाला पायी चालत जावे लागल्याच्या घटनाही मुंबईत घडल्या. त्यात आता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू होणार असेल तर, मुंबईकरांनी कोणावर विश्वास ठेवावा, असा सवालही रवी  राजा यांनी पालिका आयुक्तांना केला आहे.

ट्रॉमा सेंटरच्या अधीक्षकांनी आठ दिवसापूर्वी तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ऑक्सीजन कमतरतेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ट्रॉमा सेंटरसह केईएम, नायर, सायन, कांदिवली शताब्दी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरते बाबत अनेक तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, असा आग्रह राजा यांनी पालिका आयुक्तांकडे धरला आहे.

या रुग्णांच्या मृत्यूची मृत्यू परिक्षण समिती व राज्य टास्क फोर्स मार्फत  चौकशी करण्याचा निर्णय रुग्णसेवेसाठी ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये 117 डॉक्टर्स उपलब्ध आहेत. यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागारांचादेखील समावेश असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने केले आहे. जोगेश्वरी येथील पालिकेच्या ट्रॉमा सेंटर कोविड रुग्णालयात दोन आठवड्यात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू अक्सिजनच्या अपुर्‍या आणि सदोष पुरावठ्यामुळे झाल्याचा आरोप आहे. पालिकेने आपल्या ”डेथ कमिटी”ला त्या रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यास सांगितले आहे.