Sat, Apr 20, 2019 18:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७ नक्षलवाद्यांना कल्याण, मुंबईतून अटक

७ नक्षलवाद्यांना कल्याण, मुंबईतून अटक

Published On: Jan 13 2018 10:18PM | Last Updated: Jan 13 2018 10:18PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा  

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी रात्री कल्याण आणि मुंबई परिसरात केलेल्या कारवाईत 7 नक्षलवाद्यांना अटक केली. या 7 जणांकडे समाजाच्या भावना भडकवणारी पत्रके आढळली आहेत. हे सर्वजण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये माओवादी चळवळीचे विचार पसरवण्याचे काम करत होते.

शुक्रवारी एटीएसला त्यांच्या खबर्‍याकडून माहिती मिळल्यानंतर कल्याण स्थानकात सापळा रचण्यात आला. या नक्षलवाद्यांपैकी एकजण स्थानकात उतरल्यानंतर त्याला एटीएसने ताब्यात घेतले. त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशीवेळी या नक्षलवाद्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. यावेळी त्याने आपण सीपीआय नावाच्या माओवादी चळवळ चालवणार्‍या संघटनेचे सदस्य असल्याचे कबूल केले. त्याने इतर सहाजण आपल्यासोबत काम करत असल्याचे एटीएसला सांगितले. त्यानंतर एटीएसने वेगवेगळी पथके स्थापन करून शोध मोहिम सुरू केली. या मोहिमेत कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर, विक्रोळी येथून सहाजणांना ताब्यात घेतले. यावेळी या सहाजणांकडून समाजाच्या भावना भडकवणारी पत्रके आढळली. पंचांसमक्ष ती जप्त करण्यात आली. आपण माओवादी चळवळीचे काम करत असल्याचे या सर्वांनी कबूल केले. 

या कारवाईत तेलंगणातील नालगोंडा येथील 40वर्षीय व्यक्‍ती सध्या राहणार मुंबई, तेलंगणा येथील 40 वर्षीय व्यक्‍ती सध्या राहणार कामराज नगर, 52 वर्षीय नालगोंडा येथील पण सध्या कामराज नगर येथे राहणारी व्यक्‍ती, 40 वर्षीय व्यक्‍ती तेलंगणाच्या करीम नगरमध्ये राहणारी सध्या रमाबाई आंबेडकर  नगर येथे वास्तव्यास असणारी, 40 वर्षीय व्यक्‍ती नालगोंडा येथील सध्या कामराज नगरमध्ये राहणारी, 30 वर्षीय व्यक्‍ती नालगोंडा येथील सध्या कामराज नगर येथे राहणारी, 37 वर्षीय व्यक्‍ती मुळची नालगोंडा तेलंगणा येथील सध्या डोंबिवली पूर्वेला राहणारी. या सर्वांना अटक करून काळा चौकी पोलीस स्थानकात बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याचे कलम 20,38, 39 या अन्वये अटक करण्यात आले आहे. या सर्वांना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हे सर्वजण काम करत असलेल्या सीपीआय या संघटनेला बेकायदेशीर कारवायांंसाठी जबाबदार धरून तिच्यावर बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा 1967 नुसार बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये आपल्या चळवळीचा प्रसार आणि प्रचारासाठी हे सर्वजण काम करत होते. विशेषत: औद्योगिक वसाहत आणि जंगल भागांमध्ये त्यांच्या कारवाया चालल्या होत्या, अशी माहिती एटीएसच्या सुत्रांनी दिली.

भीमा-कोरेगावशी संबंध नाही
भीमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर या सर्वांना अटक झाल्याने त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का?, असे विचारले असता एटीएसने ही शक्यता फेटाळून लावली. त्यांचा या दंगलीशी कोणताही संबंध नाही. त्यांना नक्षलवाद्यांना मदत करत असल्याचा कारणावरून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याआधी नक्षलवादी चळवळीशी संबंधित असलेल्या कबीर कलामंचच्या सदस्यांना अटक करण्यात आली असून, भीमा-कोरेगाव दंगलीत त्यांचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.