Mon, Aug 26, 2019 01:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ऐन उकाड्यात नवी मुंबई, ठाणे शहरात ७ दिवस खंडित वीज!

ऐन उकाड्यात नवी मुंबई, ठाणे शहरात ७ दिवस खंडित वीज!

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:52AMठाणे : प्रतिनिधी 

महापारेषणच्या कळवा येथे असलेल्या सबस्टेशनमध्ये गुरुवारी रात्री अचानक बिघाड झाल्यामुळे नवी मुंबई तसेच कळवा आणि ठाण्यातील काही भागांची बत्ती काही वेळ गूल झाली होती. मागणी वाढल्याने यंत्रणेवर भार येऊन हा तांत्रिक बिघाड झाला असल्याचे महावितरणने सांगितले. सबस्टेशनच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरु असून संबंधित भागातील वीजपुरवठा या दुरुस्तीच्या काळात खंडित होऊ शकतो अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. दुरुस्तीसाठी कमीतकमी सात दिवसांचा कालावधी लागणार असल्याने या कालावधीत विजेचा लपंडाव सुरु राहण्याची शक्यता आहे. 

कळवा येथे 400 तसेच 200 केव्ही ईएचव्ही सबस्टेशन आहे. या सबस्टेशनमधून भांडुप परिमंडळातील ठाणे मंडळाअंतर्गत नौपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड या परिसरातील तर वाशी मंडळांतर्गत वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे एमआयडीसी, कोपरखैरणे,बोनकोड, या सर्व परिसराना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या सबस्टेशन अंतर्गत मोठा परिसर येत असून गुरुवारी सबस्टेशनमध्ये झालेल्या अचानक तांत्रिक बिघाडामुळे या संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा काही वेळ खंडित झाला होता. घणसोली येथे मिलेनियम बिझिनेस पार्कमध्ये देखील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या पार्कमध्ये असलेल्या कार्यालयातील काम काही वेळ थांबले होते. 

कळवा आणि नौपाडा परिसरात देखील अनेक ठिकाणी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. नौपाडा परिसरातील तर काही नागरिकांनी लाईट गेल्यामुळे फेसबुक लाईव्ह करून महावितरणच्या कारभारावर टीका केली. महावितरणचा कारभार नागरिकांपर्यंत आणण्यासाठी आम्हाला फेसबुक लाईव्ह करावे लागले अशी प्रतिक्रिया नौपाडा परिसरात राहणारे राहुल शेलार यांनी दिली. कळवा परिसरात रात्री 2 ला लाईट गेली ती थेट दोन तासांनी आली. त्यानंतर या परिसरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. सकाळीही वीजपुरवठा खंडित झाला होता. मध्यंतरी वीज पुरवठा सुरळीत असताना आता मात्र पुन्हा वीज खंडित होण्याचे प्रकार होत असल्याने हैराण झाल्याचे कळव्यातील राणा टॉवर येथे राहणार्‍या संदीप शेरखाने यांनी सांगितले. 

सध्या या परिसराच्या विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये ताळमेळ आणण्याचा प्रयत्न महावितरणच्या वतीने सुरु आहे. मात्र या परिसराची मागणी वाढल्यास पुन्हा एकदा आहे त्या यंत्रणेवर भार असल्यास पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार काही ठिकाणी वीज नियमन केले जाणार असल्याने ज्या ठिकाणी अशाप्रकारे विजेचे नियोजन केले जाणार आहे अशा ठिकाणचा वीजपुरवठा काही वेळ खंडित होण्याची शक्यता असल्याचे महावितरणने सांगितले. कळवा सबस्टेशन झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी किमान शुक्रवारचा पूर्ण दिवस लागणार असल्याने या काळात विजेचा लपंडाव सुरु राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्रभर या सबस्टेशनचे काम सुरु असून या काळात नागरिकांनी विजेचा वापर जपून करावा तसेच महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.