होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षण सुनावणी ७ दिवस आधी

मराठा आरक्षण सुनावणी ७ दिवस आधी

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी 

गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली मराठा आरक्षण याचिका आणि सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण व तरुणांच्या आत्महत्या, याच्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेची सुनावणी 14 ऑगस्टऐवजी एक आठवडा अगोदर 7 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई  यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात यावा, जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, यासाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी डिसेंबर 2017 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, न्यायालयाने मागील सुनावणीवेळी मागासवर्गीय आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त करून राज्य सरकारला आयोगाचा अहवाल 31 जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश देताना याचिकेची सुनावणी 14 ऑगस्ट रोजी निश्‍चित केली होती. 

दरम्यान, याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. लीना पाटील यांनी शुक्रवारी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई  यांच्या खंडपीठाला मराठा आंदोलनाच्या मुद्द्याबरोबरच,  राज्यात मराठा समाजाच्या सात तरुणांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आणून दिले आणि याचिकेची सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती केली. ही विनंती न्यायालयाने मान्य करून याचिकेची सुनावणी 7 ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्‍चित केले आहे.