होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २८ कोटींचा मालमत्ता कर थकवणार्‍या ७ मालमत्ता सील

२८ कोटींचा मालमत्ता कर थकवणार्‍या ७ मालमत्ता सील

Published On: Mar 11 2018 1:52AM | Last Updated: Mar 11 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी 

मालमत्ता कर थकवणार्‍यांकडे वारंवार मागणी करुनही मालमत्ता कर न भरणार्‍या मालमत्ता जप्त करण्यासह त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार 28 कोटी रुपयांचा कर चुकवणार्‍या 7 मालमत्ता पालिकेने जप्त केल्या आहेत. त्यामुळे कर चुकवेगिरी चांगलीच महागात पडणार आहे. 

जकात रद्द झाल्यामुळे उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. 31 मार्चपर्यंत मालमत्ता कराच्या माध्यमातून 5 हजार 403 कोटी रुपये एवढे कर वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे. यापैकी 3 हजार 820 कोटी एवढी रक्कम मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महापालिकेकडे जमा झाली. तर उर्वरित रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करण्यात येणार असून, 7 मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

सर्वाधिक 7 कोटी 99 लाख 61 हजार 82 रुपये थकबाकी ग्रॅण्टरोड लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्गावरील (नेपियन्सी मार्ग) येथील आशियाना इमारतीची (मे. रोहन बिल्डर्स) यांची आहे. या इमारतीच्या कार लिफ्टचा दरवाजा 5 मार्च रोजी सील करण्यात आला. याच विभागातील ग्रॅन्ट रोड स्टेशनजवळील मनाज सिनेमा (मे. माजदा थिएटर्स) यांच्याकडे 4 कोटी 13 लाख 13 हजार 761 रुपये एवढी थकबाकी असून त्यांचा मुख्य दरवाजा सील करण्यात आला आहे.     

गोरेगाव विभागात लक्ष्मीनगर, गोरेगाव परिसरातील रिलायबल बिल्डर्सच्या मोकळ्या भूखंडावरील 4 कोटी 60 लाख 92 हजार 20 रुपये एवढ्या थकबाकीचा समावेश आहे. भूखंडाचा काही भाग  सील करण्यात आला आहे. आरे रोड परिसरातील सनशाईन हाऊसींग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर यांनी 4 कोटी 8 लाख 15 हजार 138 एवढ्या थकवल्यामुळे या भूखंडाचा मुख्य दरवाजा सील करण्यात आला आहे. 

कुर्ला भागातील मे. एचडीआयएल यांच्या  मोकळ्या भूखंडावर मालमत्ता करापोटी 4 कोटी 41 लाख 83 लाख 499 एवढी थकबाकी आहे. भूखंडावरील साईट ऑफीस सील करण्यात आले आहे. देवनार इंडस्ट्रीयल प्रिमायसेस सहकारी सोसायटी यांच्या मोकळ्या भूखंडाची 2 कोटी 18 लाख 33 हजार 264 रुपये मालमत्ता कर थकबाकी आहे. त्यामुळे या मालमत्तेचा मुख्य दरवाजा सील करण्यात आला आहे. खार परिसरातील 15 वा रस्त्यावर असणार्‍या ट्वीलाईट सोसायटीच्या मोकळ्या भूखंडाचा 90 लाख 71 हजार 73 एवढा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे या मालमत्तेचा मुख्य दरवाजा सील करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी सांगितले.