Mon, Jul 22, 2019 13:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिकेच्या ६६ शाळांचा कायापालट

मुंबई पालिकेच्या ६६ शाळांचा कायापालट

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी 

चेंबूर स्टेशनजवळील मनपा शाळेसह कुर्ल्यातील संघर्ष नगरमधील मनपा शाळा अथवा कुरार गावातील मनपा शाळा असो, या शाळा पिवळ्या व तपकिरी रंगांनी नटल्या आहेत.  शाळांचे नवीन रुपडे  सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या वर्षभरात 4 शाळा इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले असून तब्बल 62 शाळा इमारतींच्या दुरुस्तीनंतर नवीन रंगरूप घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी करण्यास सज्ज झाल्या आहेत. 

पालिकेच्या शाळांमध्ये सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील शिक्षण अधिक आनंददायी व्हावे, तसेच मनपा शाळा इमारतींची स्वतंत्र ओळखदेखील तयार व्हावी, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक शाळांची मोठी दुरुस्तीकामे हाती घेण्यात येत आहेत. तर काही इमारतींचे पुनर्बांधकाम करण्यात येत आहे. त्यानुसार 66 शाळांच्या इमारतींचे रूपडे पालटण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांनी सांगितले. पुनर्बांधकाम पूर्ण झालेल्या चार शाळांच्या इमारतींमध्ये एफ दक्षिण विभागातील परळ भोईवाडा मनपा शाळेच्या पुनर्बांधकामाचा समावेश असून यासाठी 10 कोटी 55 लाख एवढा खर्च आला आहे. पी उत्तर विभागातील एम.एच.बी. गेट नंबर 7 मनपा शाळेच्या पुनर्बांधकामासाठी 26 कोटी 46 लाख रुपये व एम. एच. बी. गेट नंबर 8 मनपा शाळेच्या पुनर्बांधकामासाठी 12 कोटी 32 लाख रुपये एवढा खर्च आला आहे. 

या व्यतिरिक्त एम पूर्व विभागातील शिवाजी नगर क्रमांक 3 (चिखलवाडी) मनपा शाळेच्या इमारतीच्या पुनर्बांधकामासाठी 23 कोटी 11 लाख रुपये एवढा खर्च आला आहे. 62 शाळा इमारतींची मोठी दुरुस्ती कामेदेखील पूर्ण झाली आहेत. शाळेच्या रंगरंगोटीच्या वेळी पिवळ्या किंवा तपकिरी रंगाचा प्राधान्याने वापर करण्यात आला आहे. 62 इमारतींच्या मोठ्या दुरुस्ती कामांसाठी महापालिकेला  96 कोटी 23 लाख रुपये एवढा खर्च केल्याचे जर्‍हाड यांनी सांगितले. शाळांची दुरुस्ती करताना विद्यार्थी - विद्यार्थिंनींसह दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालये, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेच्या परिसरात रॅम्पसारख्या आवश्यक त्या सोयीसुविधा, साधारणपणे प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागे एक शौचकुप, आवश्यकतेनुसार अतिरिक्त वर्गखोली आदींचा समावेश आहे.