होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा परिषदेसाठी ६५ टक्के मतदान

ठाणे जिल्हा परिषदेसाठी ६५ टक्के मतदान

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:27AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

साडेतीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या  निवडणुकीत भिवंडीतील काल्हेर मतदान केंद्रावरील हाणामारी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज वगळता संपूर्ण जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सुमारे 65 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून 439 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद केले आहे. मतमोजणी आज (गुरुवारी) सुरुवात होणार असल्याने जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

ठाणे जिल्हा परिषदेच्या 52 गटासाठी आणि 106 गणांसाठी बुधवारी सकाळी 7.30 ला मतदानाला सुरुवात झाली. धुक्याची पसरलेली चादर आणि कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता मतदार हे मतदानासाठी उतरले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. मतदारांच्या पाचवीला पुजलेल्या मतदार याद्यांमधील घोळ या निवडणुकीतही दिसून आला. मतदारांना आपली नावे आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी कसरत करावी लागत होती. अनेक मतदारांना तर मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील एका मतदान केंद्रावरील हाणामारीने गालबोट लावले. 

काल्हेर येथे शिवसेना पंचायत समिती उमेदवार दीपक म्हात्रे व भाजपा उमेदवार महेंद्र पाटील यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यात भांडण सोडविण्यासाठी गेलेले माजी आमदार योगेश पाटील यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने वातावरण तापले आणि पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. नंतरचे मतदान हे मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडले.