Sun, Aug 25, 2019 19:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावीच्या ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

बारावीच्या ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर गेल्या सहा दिवसापासून बहिष्कार टाकल्याने राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या तब्बल 65 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. सरकार यासंदर्भात तोडगा काढत नसल्याने पेपरचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे बारावीचा निकाल लटकण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रलंबित मागण्यासंदर्भात ठोस शासन निर्णय निघत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज पूर्णपणे ठप्प असून शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासलेली नाही. 

इंग्रजी, हिंदी, मराठी, भौतिकशास्त्र, एस. पी., राज्यशास्र, सहकार, उर्दू, भूगर्भशास्र या विषयांच्या मुख्य नियामकांच्या सभाही झालेल्या नाहीत. तसेच या विषयांच्या नियमकांच्याही मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर, कोकण (रत्नागिरी) या सर्व विभागातील नियोजित सभाही प्रलंबित आहेत. या सर्व विभागीय मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवांना तेथील नियामकांनी आणि विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बहिष्कार आंदोलनाचे मुख्य नियामक व नियामकांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे.