Sun, May 19, 2019 14:40
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात 11 महिन्यांत 63 बालकांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात 11 महिन्यांत 63 बालकांचा मृत्यू

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 1:44AMठाणे : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालमृत्युचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी घटले आहे. मागीलवर्षी एप्रिल 16 ते मार्च 17 या कालावधीत 107 बालकांचा मृत्यू झाला होता. यावर्षी एप्रिल 17 ते फेब्रुवारी 18 पर्यंत 63 बालकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण 44 ने घटले असल्याचे शासकीय आकडेवारीवरुन दिसून येतेे. 

ठाणे जिल्हा हा दुर्गम आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातोे. या आदिवासीबहुल समाजात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा रूढ आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होतात. यामध्ये कमी वजनाची बालके, जुळी जन्माला येणारे बालके, अपघात, सर्पदंश, जन्मजात अपंग अशा 45 कारणांमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हीच बाब लक्षात घेवून बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला त्या कारणांवर चर्चा करून मुळाशी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आदिवासी भागात जन्माला येणार्‍या बालकांची आरोग्य विभागाद्वारे नियमीत लसीकरण, तपासणी, मानव विकास शिबीर घेऊन बालरोग तज्ज्ञामार्फत उपचार, तसेच सॅम आणि मॅम बालकांची 15 दिवसांनी तपासणी, बालक-पालकांच्या सभा आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले. तसेच गाभा समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक दरमहा घेण्यास सुरुवात झाल्याने बालमृत्यूचे प्रमाण घटल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नुकत्याच गाभा समितीची बैठक झाली. यावेळी बालमृत्यूचे प्रमाण घटल्याची माहिती देण्यात आली.