Thu, May 28, 2020 23:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेलमध्ये ६२० आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे दाखल

पनवेलमध्ये ६२० आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे दाखल

Published On: Jan 04 2018 8:36PM | Last Updated: Jan 04 2018 8:36PM

बुकमार्क करा
पनवेल : प्रतिनिधी 

 भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पनवेल येथील रस्त्यांवर उतरलेल्या जवळपास ६२०आंदोलकांवर कळंबोली, कामोठे आणि पनवेल शहर तसेच खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात दंगल तसेच पोलिसांसोबत असभ्य वर्तन केल्याचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी ३५ आंदोलकांना अटक केली असून आज कोर्टात हजर करण्यात अले आहे. तर ६०० हून अधिक आंदोलक फरार झाले आहेत. या निषेधादरम्यान पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या एका आंदोलकाला हत्यारासह पोलिसांनी अटक केली आहे.

भीमा कोरेगाव येथे दलितांवर झालेल्या हल्‍ल्याच्या निषेधार्थ दलीत संघटनानी बुधवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या महाराष्ट्र बंदला पनवेल तालुक्यात गालबोट लावण्याचे काम काही आंदोलकांनी केले आहे. त्यामुळे शांततेत पार पडणार्‍या या महाराष्ट्र बंदला हिसंक वळण देत गालबोट लावण्याचे काम पनवेल सारख्या शहरात घडले आहे. पनवेल तालुक्यात पनवेल शहर, आयटीआय नाका, पनवेल एसटी स्टँण्ड, ठाणा नाका, खांदा कॉलनी सिग्नल, कळंबोली सिग्नल आणि मुबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको करून आंदोलकांनी आपला निषेध व्यक्त केला.

यावेळी काहींनी आंदोलनाला हिसंक वळत देत पनवेल मध्ये १६ बसेस फोडून आपला निषेध व्यक्त केला. तर खांदा कॉलनीत एका रिक्षा चालकाला जबर मारहाण करून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला. तसेच कळंबोली सर्कल जवळ एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली. या सोबत काही आंदोलकांनी मानसरोवर स्थानकांत शिरून रेल रोको आंदोलन केले. अशा आंदोलकांवर पनवेल तालुका हद्दीतील ७ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून काहींना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिस कर्मचारी नाटे यांना पनवेलमध्ये मारहाण

बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलना दरम्यान पनवेल एसटी स्थानक परिसरात काही आंदोलकांनी बंदोबस्तासाठी हजर असलेल्या नाटे नावाच्या पोलिस कर्मचार्‍यांला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याची खंत पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे़. या पोलिस कर्मचार्‍यांला मारहाण करताना सहकारी पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढत वाचवले असल्याची कबूली चक्क पोलिस देत असल्याचे समोर आले आहे.

मारहाण कर्मचारी पोलिस नसून रिक्षा चालक : पोलिस प्रशासन

पनवेल एसटी स्थानकात घडलेल्या मारहणाच्या प्रकारानंतर हा पोलिस कर्मचारी नसून  रिक्षा चालकाला मारहाण झाल्याची स्पष्टोक्ती पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आता देऊ लागले आहे . मात्र, आपल्याच कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा प्रकार पोलिस लपवत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

प्रकाश निलेवाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न

पनवेल एसटी स्थानक परिसरात आंदोलनाच्या दरम्यान बंदोबस्तासाठी हजर असलेल्या सहाय्यक पोलिस आयुक्ट प्रकाश निलेवाड यांच्यावर एका आंदोलकाने प्राणघातक हल्ला चढवण्याच्या प्रयत्न करतांना पोलिसांनी त्यांला अटक केली आहे. त्यांच्याकडे धारधार शस्त्र मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.